मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे ती विचित्र आहे. जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही अशी राजकीय परिस्थिती पाहिली नसेल. दोन पक्ष सत्तेतही आहेत आणि विरोधातही असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईतल्या एका सभेत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. असं राजकारण मी कुठेही पाहिलं नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल जिथे दोन पक्ष असे आहेत ज्यात अर्धा पक्ष सत्तेत अर्धा बाहेर अशी स्थिती आहे. सत्तेत कोण आहे? शिवसेना, बाहेर कोण आहे शिवसेना. सत्तेत कोण आहे राष्ट्रवादी, विरोधात कोण आहे? राष्ट्रवादी. अशी परिस्थिती पाहिली आहे का? हे काय राज्य म्हणायचं का? फक्त दिवस ढकलत आहेत.” असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली.
“सध्या कुठे कुणाचंही लक्षच नाही. तुम्ही जगा-मरा, मतदानाच्या दिवशी जिवंत राहा, त्यानंतर तिथेच मेलात तरीही चालेल.” अशी भीषण स्थिती आहे. असं राज ठाकरे म्हणाले आहेत. “कुणीतरी किशोर रुपचंदानी हा माणूस त्याचं इगल कन्सट्रक्शन आहे. त्याने बांधलेला फ्लायओव्हर पडला. एक बातमीही झाली त्यानंतर काही नाही. संबंधित मंत्र्यांचा कुणी राजीनामाही मागितलेला नाही. करोडो रुपये वाया जात आहेत, जनता भरडली जाते आहे. काय चाललं आहे मला काही समजत नाही. ज्या देशातल्या नागरिकांना राग येत नाही त्यांचं काय करायचं? किशोर रुपचंदानीचं ९८० कोटींचं काम मुंबईत दिलंय. ज्यांनी बांधलेले उड्डाणपूल पडत आहेत त्यांनाच एवढी कंत्राटं दिली जात आहेत. लोक सहन करत आहेत. रस्त्यावर खड्डे पडले, पडले. लोकांचा जीव जातोय पण कुणालाही राग येत नाही. निवडणुका कधी लागणार कुणीही विचारत नाही.”
“आत जे धुमसत आहेत ते एकदिवस बाहेर काढेन. इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले यांना त्या गोष्टीचे तर पाहा. तुर्तास या निवडणुकांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे”, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.