भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने भ्रष्टाचाराचे आणि अवैध बांधकामाचे आरोप केल्यानंतर आज ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर आगपाखड केली आहे. म्हाडा इमारतीमधील अनिल परब यांच्या कार्यालयाच्या अवैध बांधकामावर सोमय्यांनी आक्षेप घेतला होता. ते कार्यालय सोमवारी सोसायटीने पाडल्यानंतर आज तिथे हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या स्वत: तिथे पाहणी करण्यासाठी निघाले असताना अनिल परब यांनी ‘सोमय्यांनी इथे येऊन दाखवावं, त्यांचं स्वागत करायला आम्ही सज्ज आहोत’ म्हणत थेट चॅलेंज दिलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमय्या विरुद्ध परब असा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले अनिल परब?
अनिल परब यांनी यावेळी संबंधित कार्यालयाच्या बाबतीत कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “१९६० साली या म्हाडाच्या इमारती बांधल्या गेल्या. मी आज माजी मंत्री म्हणून नाही, तर या म्हाडाच्या इमारतीचा एक रहिवासी म्हणून बोलतोय. या इमारतीत माझं लहानपण गेलं. इथेच मी मोठा झालो. मी आमदार झालो तेव्हा इथल्या लोकांनी मला सांगितलं की आपलं जनसंपर्क कार्यालय इथेच राहू द्या. सोसायटीची जागा तुम्ही वापरा, आमची हरकत नाही. त्यामुळे ही जागा मी वापरत होतो. पण सोमय्यांनी याबाबत तक्रार करून कार्यालय तोडण्याची मागणी केली. त्यावर म्हाडाने मला नोटीस दिली. मी तिथे सांगितलं की ही जागा माझी नाही, सोसायटीची आहे. माझा या जागेशी संबंध नाही. त्यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली”, असं अनिल परब यावेळी म्हणाले.
“यानंतर इमारतीतील रहिवासी न्यायालयात गेले. न्यायालयाने नियमितीकरण करण्याचा अर्ज करण्याचे निर्देश दिले. त्या अर्जावर म्हाडाने सांगितलं की हे नियमितीकरण करता येणार नाही. किरीट सोमय्यांनी याबाबत म्हाडावर दबाव टाकला. त्यानंतर म्हाडान आम्हाला पत्र लिहून हे बांधकाम नियमित करता येणार नाही असं सांगितलं. त्यानंतर सोसायटीने बैठक घेऊन ही जागा मोकळी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही जागा मोकळी करण्यात आली”, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
MHADA Letter : अनिल परब यांनी किरीट सोमय्यांचे सगळे आरोप ज्याआधारे खोडले त्या पत्रात काय आहे?
“सोमय्या माझ्यासह राणेंच्या घरी येणार का?”
“हा विषय आजचा नाही. जेव्हा घरं वाढवण्यात आली, तेव्हा हे नियमितीकरण करण्यासाठी २० वर्षांपूर्वी अर्ज केला होता. पण ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. पण अनिल परबांचं ऑफिस तोडलं तर दहशत निर्माण करता येईल अशा विचारातून हे करण्यात आलंय. भाजपाने हा किरीट सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला डाव आहे का? भाजपाचा या सगळ्याला पाठिंबा आहे का? हा माझा प्रश्न आहे. किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे की नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या तिथे येणार आहेत का माझ्यासोबत बघायला? मी तर म्हाडाच्या लोकांना घेऊन जाणारच आहे तिथे. ते घर कसं तोडलंय ते बघायचंय”, अशा शब्दांत अनिल परब यांनी सोमय्यांना जाहीर आव्हान दिलं आहे.
“…तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही”, म्हणत अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान
“किरीट सोमय्या कोण आहे? तो म्हाडाचा किंवा महानगर पालिकेचा अधिकारी आहे का? तो येऊन बघणारा कोण आहे? या सोसायटीने म्हाडाला पत्र लिहिलंय की इथलं कार्यालय तोडलंय, पूर्ववत केलंय, तुम्ही अधिकारी पाठवा आणि त्यानुसार पुढची कारवाई करा. मग म्हाडानं किरीट सोमय्याला नेमलंय का हे सगळं करण्यासाठी? जर नेमलं असेल, तर माझ्यासह ५६ वसाहतींमध्ये जे जे वाढलंय, या सगळ्यांवर तशीच कारवाई झाली, तर त्याची जबाबदारी किरीट सोमय्यांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपाची असेल. मी ५६ म्हाडा वसाहतींचा प्रतिनिधी आहे”, असं म्हणत अनिल परब यांनी म्हाडालाही लक्ष्य केलं आहे.
“किरीट सोमय्या खोटं बोलत आहेत याचे पुरावेच…” म्हाडा कार्यालयातून आल्यावर काय म्हणाले अनिल परब
“किरीट सोमय्या मुकादम आहे का?”
“किरीट सोमय्या काय म्हाडाचा किंवा पालिकेचा मुकादम आहे का? तो का येणार आहे ऑफिस बघायला? यंत्रणा किरीट सोमय्याच्या दबावाखाली येतात. किरीट सोमय्या त्यांना ईडी-सीबीआयचा दम देतो. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. आता मी पुन्हा रस्त्यावर आलो आहे”, असं अनिल परब यावेळी म्हणाले.