मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानींनी विमानतळ आणि विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकांमुळे शिवसेना संतापली आहे. अदानी विमानतळ असे फलक लावून अदानींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचं सांगत शिवसेनेने तोडफोड केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर लावलेल्या अदानींच्या नामफलकाची तोडफोड केली आहे. दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या तोडफोडीचं समर्थन केलं आहे.
मोठी बातमी! मुंबई विमानतळावर लावलेल्या ‘अदानीं’च्या नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड
एबीपी माझाशी बोलताना अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केली. “अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिलं आहे. दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव बाह्यांवर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. सांगूनही जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. तो काय अदानी विमानतळ आहे का ?. याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?,” अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे.
मुंबई विमानतळाबाहेर तोडफोड
मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध केला असून तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला असून नामफलकाची तोडफोड करण्यात आली.
मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजी बोलून दाखवली होती.
राऊत काय म्हणाले होते –
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी गेटवर अदानी एअरपोर्ट बोर्ड लावण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, “ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे. शिवसेनेने त्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यामुळे कोणा उद्योगपतींच्या नावे विमानतळ ओळखलं जाणार असेल तर मान्य नाही. ते महाराजांच्या नावेच ओळखलं जावं”.
महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
“छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव फक्त महाराष्ट्र, मुंबई किंवा देशापुरतं नसून संपूर्ण जगभरात ओळखलं जातं. याआधी जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या तिथे होत्या. पण त्यांनी कधीही विमानतळाला नाव दिलं नाही. अदानींनी विमानतळ विकत घेतलं आहे का? विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं असताना जाणुनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम का करत आहेत? कशासाठी?,” अशी विचारणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.