गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चर्चा सुरू आहे ती शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याची. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. मात्र, दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदेंनी केला. त्यामुळे सरवणकर विरुद्ध शिंदे असा हा सामना सुरू असतानाच पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
दहाव्या दिवशी मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्यात सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेवर टीका करणारं भाषण केल्यानंतर वातावरण अधिकच तापलं होतं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद अधिक न चिघळता मिटला.दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, हा कौटुंबिक वाद होता, असं म्हणत सदा सरवणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणी आज शिवसेना कार्यकर्त्यांनी दादर पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन करत शिवसेना गटातील लोकांवरील गुन्हे हटवण्याची आणि शिंदे गटातील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केली असून शिंदे गटातील संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं. तसेच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलला ३९५चा गुन्हा देखील मागे घेण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याचं ते म्हणाले.
यासंदर्भात बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “ठाकरे सरकारनं गुंडांचा बंदोबस्त केला. त्यांच्या कारकिर्दीत एकही दंगा घडला नाही. कुणाची हिंमत झाली नाही. आता राज्यकर्तेच बोलत आहेत. एक म्हणतो चुन चुन के मारेंगे, दुसरा म्हणतो तंगड्या तोडीन, तिसरा आमदार गोळीबार करतो. चौथी महिला खासदार पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांशीच गैरवर्तन करते. पण गुन्हा दाखल होत नाही”.
“..तर मग खरी शिवसेना काय आहे हे कळेल”
“कारवाई होत नाही, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. शिवसेना कार्यकर्त्यांवर खोटा ३९५ गुन्हा दाखल केला, तो काढून घेण्याची मागणीही आम्ही केली. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मग खरी शिवसेना काय आहे हे ज्यांना कुणाला पाहायचंय, त्यांना ते कळेल”, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला.
“अडीच वर्षांत जे पेरलंय, ते आता उगवतंय”, प्रभादेवीतील घटनेवरून मनसेचा शिवसेनेला टोला!
“मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”
दरम्यान, या सगळ्या प्रकाराची लाज वाटून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असंही अरविंद सावंत यावेळी म्हणाले. “पोलिसांवर कोणता दबाव आहे? राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तर इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. या सगळ्या प्रकारावर त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे. कायदा-सुव्यवस्था पाळण्याचं काम राज्यकर्त्यांचं अधिक असतं. आज राज्यकर्तेच गुंडगिरी करायला निघाले आहेत. म्हणून राज्यात जी अवस्था निर्माण झाली आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो”, असंही अरविंद सावंत यांनी यावेळी नमूद केलं.