मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ बघायला मिळाली. यावरून शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे असे दोन गट पडले. या काळात शिवसेना पक्षनाव आणि धनुष्याण चिन्ह कोणाचं यावरूनही बराच वाद रंगला. दरम्यान, यासंपूर्ण प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. मात्र, आपल्या नेत्याला असं अडचणीत बघून एका महिला कार्यकर्त्याने जोपर्यत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे.
हेही वाचा – भाजपशी मैत्री केलेल्या अन्य प्रादेशिक पक्षांसारखीच शिवसेनेची अवस्था होणार का ?
कल्याणमधील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आशा रसाळ यांनी जोपर्यत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेतली आहे. मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवींच्या चरणी साकळं घालून रसाळ यांनी ही शपथ घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “आज महाराष्ट्र संकटात आहे. बाळासाहेबांची शिवसेना संकटात आहे. त्यामुळे शिवसैनिक म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही.”
हेही वाचा – “…याचा अर्थ असा नाही की कट रचत आहे”, राजा ठाकूरच्या पत्नीची संजय राऊतांविरोधात तक्रार
पुढे बोलताना, त्यांनी राज्यातील जनतेला उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहनही केलं. “आज असत्याचा विजय होताना दिसून येत आहे. मात्र देवापुढे सर्वच सारखेच आहेत. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मातेच्या दर्शनासाठी आलो आहे. मी राज्यातील जनतेला विनंती करते की त्यांनी सत्याच्या बाजूने उभं राहावं. आपल्याला विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे”, असे त्या म्हणाल्या.