इस्लामशी टक्कर देण्यासाठी केवळ मराठीचा गजर न करता बंगाली, गुजराती, पंजाबी यांची एकजूट करण्याची हाक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून हिंदूच्या एकजुटीत बिहारींसह उत्तर भारतीयांचे स्थान काय असेल, याबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे. मनसेने शिवसेनेचा ‘मराठी माणूस’ मुद्दा पळविल्याने आता शिवसेनाप्रमुखांनी व्यापक हिंदूत्वाची तळी उचलून धरून राज ठाकरे यांना शह दिला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये ठाकरे यांची मुलाखत प्रसिध्द झाली असून इस्लामशी लढण्यासाठी हिंदूंची एकजूट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मी मराठी माणसावर प्रेम करतोच, पण मराठी, बंगाली किंवा पंजाबी करून भागणार नाही. कोणीही इस्लामविरूध्द एकाकी लढू शकत नाही. त्यासाठी ‘हिंदूत्व’ मुद्दय़ावर हिंदूंची एकजूट झाली तरच इस्लामविरोधात लढता येईल, असे मत शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेने स्थापनेपासून ‘मराठी माणूस’ मुद्दा लावून धरला. उत्तर आणि दक्षिण भारतीयांविरोधात आंदोलने केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मराठी माणसाचे हक्क आणि महाराष्ट्र धर्म’ जागविल्याने शिवसेनेवर कुरघोडी केल्याचे चित्र गेल्या काही काळात निर्माण झाले होते. मराठी माणसाच्या प्रश्नांमध्ये किंवा आंदोलनांमध्ये शिवसेना व मनसेची स्पर्धा झाल्याचीही उदाहरणे आहेत. बिहारी व उत्तर भारतीयांविरूध्द राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून देशभर गदारोळ उठला आहे. त्यामुळे आता शिवसेनाप्रमुखांनी ‘महाराष्ट्र धर्म’ व ‘हिंदुत्व’ अधिक व्यापक करून आता बंगाली, गुजराथी व पंजाबी यांना आपले मानले आहे. राज ठाकरे यांनी मराठी माणसाचा गजर सुरू ठेवल्याने शिवसेनेने आता मराठी माणसांबरोबरच अन्य प्रदेशातील लोकांनाही हिंदुत्वाच्या छत्राखाली आणण्यास सुरूवात केल्याने राज ठाकरे यांना शह बसणार आहे. मात्र बिहारी व उत्तर भारतीयांना दीर्घकाळ विरोध केल्याने शिवसेनेला त्यांना आणि तेथील नेत्यांना बरोबर घेऊन जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे हिंदूत्वाच्या या एकजुटीत बिहार व उत्तर भारतीय असण्याची शक्यता कमी आहे.
शिवसेनेच्या ‘महाराष्ट्र धर्मा’त आता पंजाबी, बंगाली आणि गुजराती!
इस्लामशी टक्कर देण्यासाठी केवळ मराठीचा गजर न करता बंगाली, गुजराती, पंजाबी यांची एकजूट करण्याची हाक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून हिंदूच्या एकजुटीत बिहारींसह उत्तर भारतीयांचे स्थान काय असेल, याबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे.
आणखी वाचा
First published on: 11-09-2012 at 10:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena balasaheb thakre bal thakre hindu mumbai maharashtra