ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या सदस्य पदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती झाल्याची घोषणा रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.
नियोजन समितीच्या ४० जागांसाठी होणाऱ्या या निवडणूकीत महानगरपालिका, नगरपालिका तसेच नगरपरिषदेचे सदस्य मतदान करीत असतात. शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिघांकडे २७६ सदस्यांचे संख्याबळ असून काँग्रेस – राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्यासाठी महायुती करण्याचा निर्णय घेण्यात    आला.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीतून मांडलेल्या प्रस्तावानंतर जिल्हास्तरावर का होईना, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या  बैठकीला शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, भाजपचे संजय केळकर आणि मनसेचे गिरीश धानुरकर हे स्थानिक नेते उपस्थित होते. हे तिघे एकत्र येऊन निवडणूक लढवून नियोजन समितीवर वर्चस्व राखण्यासाठी आता प्रयत्न करणार आहेत.

Story img Loader