शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील चबुतऱ्याचा वाद सामोपचाराने मिटावा, अशी भूमिका विधानसभेत घेणाऱ्या शिवसेनेने या मैदानाच्या नामांतराबाबत मात्र मुंबईत ठाम भूमिका घेतली आहे. शिवाजीपार्कचे नामांतर ‘शिवतीर्थ’ असे करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावास पालिकेतील सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. पण काहीही झाले तरी सभागृहात हा प्रस्ताव संमत करून घेऊच, असा दावा महापौर सुनील प्रभू यांनी सोमवारी केला.
विधिमंडळात शिवसेनेची सावध भूमिका
 नागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या जागेवरील चबुतरा हटविण्यावरून सध्या सरकार आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. या वादाचा मुद्दा विधानसभेत शोकप्रस्तावावरील चर्चेत सोमवारी उपस्थित झाला. सध्या शिवाजी पार्कवर निर्माण झालेला वाद सामोपचाराने मिटावा. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आमच्या नेत्यांशी चर्चा करून या वादावर तोडगा काढावा, अशी सूचना शिवसेनेचे एकनाथ शिंदे, विनोद घोसाळकर, रवींद्र वायकर आदी सदस्यांनी केली. वायकर यांनी तर नवी मुंबईत नव्याने होत असलेल्या विमानतळास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली. तर मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी विधिमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. तसेच १७ नोव्हेंबर हा दिवस बाळासाहेबांची पुण्यतिथी म्हणून सरकारने घोषित करवा अशी मागणीही त्यांनी केली.    
पालिकेत नामांतरास तीव्र विरोध
 मुंबई : शिवाजीपार्कचे नाव बदलून ते ‘शिवतीर्थ’ करावे अशी सूचना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आणि गटनेत्यांच्या बैठकीत शिवाजीपार्कच्या नामांतराची सूचना मांडली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी याला विरोध केला आहे. मात्र, पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने हा प्रस्ताव बहुमताने संमत करून घेऊन राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने १९२७ साली ‘माहीम पार्क’चे ‘शिवाजी पार्क’ असे नामांतर करण्यात आले होते. त्याच शिवाजी पार्कचे आता ‘शिवतीर्थ’ नाव बदलण्याची सूचना शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पण विद्यमान मैदाने, मनोरंजन मैदाने आणि उद्याने यांना देण्यात आलेली भारतीयांची नावे बदलण्यात येऊ नयेत, असा ठराव मुंबई महापालिकेने ८ मे २००८ रोजी केला आहे. त्यामुळे शिवसेनेने घेतलेली भूमिका चुकीची असून त्याला आम्ही सभागहात कडाडून विरोध करू, असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या नामांतराला विरोध केला आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपाने मात्र आपले पत्ते अजून उघडे केलेले नाहीत.    
या आहेत मागण्या  :
* मुंबईत बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारा.
*  नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव द्या.
*  विधिमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावा.
* १७ नोव्हेंबर बाळासाहेबांची पुण्यतिथी म्हणून जाहीर करा.
*  शिवाजी स्मारकाचे नामांतर शिवतीर्थ असे करा.
* पाठय़पुस्तकात बाळासाहेबांवरील धडा समाविष्ट करा.

Story img Loader