कन्हैया कुमारचा गळा दाबणारे लोक ‘भारत माता की जय बोलणार नाही’, अशी मग्रुरीची भाषा करणार्‍या ओवेसीचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार का, असा खडा सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्यावर काल पुण्याला जात असताना विमानात झालेल्या कथित हल्ल्याचा धागा पकडत सेनेने भाजपवर आसूड ओढले आहेत. कन्हैयाचा गळा दाबल्याने त्याचा आवाज बंद होण्याची शक्यता नाही. खरं तर गळा दाबावा असे लोक आपल्या सभोवताली आहेत. ‘भारतमाता की जय बोलणार नाही’ अशी मग्रुरीची भाषा करणार्‍या ओवेसीचा गळा दाबायला हे लोक पुढे येणार नाहीत. पठाणकोटचा बदला घेऊ असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात, पण पाकिस्तानचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार आहात काय? असे अनेक प्रश्‍न देशात विचारले जात असल्याचे ‘सामना’मधील अग्रलेखात म्हटले आहे.
फक्त लक्ष वेधण्यासाठी कन्हैयाने रचला हल्ल्याचा बनाव, कथित हल्लेखोराचा दावा
याशिवाय अग्रलेखातून केंद्र सरकारने मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील लक्ष्य करण्यात आले आहे. पश्‍चिम बंगालातही मोदीसाहेब प्रचार सभा घेत आहेत, पण महाराष्ट्राचा आक्रोश ऐकून ते येथे पोहोचू शकले नाहीत हे दु:ख मराठवाड्याच्या मनात खदखदत आहे व कन्हैयाकुमारसारख्या टिनपाटांना त्यामुळे बोलायला विषय मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करावी अशी लायकी कन्हैयाची नाही, पण कन्हैयाची मूर्ती घडवून त्यात राजकीय प्राण फुंकणारे कोण, त्याचे आत्मपरीक्षण भाजपने केले तर बरे होईल, असा टोला सेनेने भाजपला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा