केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा, असे आवाहन केले आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार एकीकडे जनतेला ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडते आणि दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदाणी यांना मिठी मारून बसले आहे, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

हेही वाचा – Cow Hug Day : ‘१४ फेब्रुवारीला गायीला मिठी मारा’ केंद्र सरकारच्या निर्देशावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कोणाला मिठ्या…”

‘काऊ हग डे’ वरून मोदी सरकारवर टीकास्र

“देशातील शेतकरी आज पशुधनाचा सांभाळ कसा करायचा, स्वतःच्या पोरांचं पोट भरायचं की पशुधनाचं, या विवंचनेत आहे. त्यांची ही विवंचना दूर करणे राहिले बाजूला, मोदी सरकार एकीकडे जनतेला ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडते आहे आणि दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदाणी यांना मिठी मारून बसले आहे”, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

“उधळलेल्या ‘बिग बुल’ची चौकशी करणार का?”

“अदानी हे शेअर बाजारातील ‘बिग बुल’ असले तरी मोदी यांच्यासाठी ते ‘होली काऊ’ आहेत. तसे नसते तर या ‘होली काऊ’साठी त्यांनी इतका आटापिटा केला नसता. इकडे गोमाता चारा-पाण्याशिवाय हंबरते आहे आणि मोदी सरकार ‘बिग बुल’च्या दाणापाण्याचे पाहात आहे, जनतेला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारायला सांगत आहे. चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने, उधळलेल्या ‘बिग बुल’च्या गुन्ह्यांची चौकशी मोदींचे सरकार करणार आहे काय?” असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.

हेही वाचा – “गाईला पुढून मिठी मारली तर शिंग मारेल अन् मागून मिठी मारली तर…”, आव्हाडांची तुफान टोलेबाजी!

“मोदी सरकारकडून पुन्हा धर्माच्या गुंगीचे औषध”

दरम्यान, संसदेतील भाषणावरूनही शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ‘‘अदानी अदानी’’ अशा घोषणा सुरू असतानाही पंतप्रधान मोदी यांनी अदानी घोटाळय़ावर एक शब्दही उच्चारला नाही, पण अदानी घोटाळय़ांवर उतारा म्हणून मोदींच्या सरकारने 14 फेब्रुवारी रोजी ‘गाय आलिंगन दिन’ साजरा करण्याचे फर्मान सोडले आहे. गाय ही हिंदुस्थानी संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ती कामधेनू आणि गोमाता म्हणून ओळखली जाते. गाईला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. त्यामुळे गाईला मिठी मारा, असे फर्मान पशू कल्याण मंडळाकडून निघाले. लोकांना अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते, पण मोदी सरकारने लोकांना पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केले, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली.

Story img Loader