दादर म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळत नसल्याने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दलच नाराजी व्यक्त करणारे ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांना रविवारी शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाचे ‘दादर’ अर्थात जिना दाखवला! जोशी यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर पाऊल ठेवताक्षणी जमलेल्या गर्दीतून सुरू झालेल्या निषेधाच्या घोषणांमुळे त्यांना खाली उतरावे लागले, तर उद्धव ठाकरे यांच्यासह एकाही शिवसेना नेत्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न न केल्याने सर अत्यंत पडलेल्या चेहऱ्याने मेळाव्यातून चालते झाले. आजवरच्या दसरा मेळाव्यांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या खुर्चीवर दिसणाऱ्या जोशी यांना बाळासाहेबांच्या निधनानंतरच्या पहिल्याच मेळाव्यात मिळालेल्या वागणुकीची चर्चा उद्धव यांच्या भाषणापेक्षाही अधिक होती.
काही दिवसांपूर्वी मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे ते रविवारी दसरा मेळाव्यात उपस्थित राहतील का, याबाबत चर्चा सुरू होती. व्यासपीठावर शरद पोंक्षे यांचे भाषण सुरू असतानाच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यानंतर काही मिनिटांतच जोशी व्यासपीठावर आले. मात्र, त्यांना पाहताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बाळासाहेबांचे छायाचित्र असलेले फलक उंचावत ‘मनोहर जोशी चले जाव’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. हा प्रकार जोशी यांनाही अनपेक्षित असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. मात्र, व्यासपीठावरील सर्वच नेते शांतपणे बसून होते. त्यामुळे भांबावलेले जोशी खुर्चीतून उठले आणि उजवीकडून तडक खाली उतरले. तेथून ते तडक आपल्या घरी निघून गेले. त्यानंतर जणू काहीच घडले नाही, अशा वातावरणात उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले. उद्धव यांच्यासह एकाही नेत्याने जोशी यांना रोखण्याची तसदी घेतली नाही.
‘शिवसेनेचे नेतृत्व कोणी करायचे हे तुम्ही ठरवायचे, असे शिवसैनिकांना आवाहन करीत विश्वास नसेल तर एक क्षणभरही मी पक्षप्रमुख म्हणून राहणार नाही,’ असे उद्धव म्हणाले. शिवसैनिक वगळता मी पक्षात कोणाचेही दडपण जुमानणार नाही, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे जोशी यांनाच इशारा दिला.
तो प्रकार गैरसमजुतीतून
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये घडलेला प्रकार गैरसमजातून झाला. माझा शिवसैनिकांवर राग नाही. आधीही नव्हता आणि आताही नाही, अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी  दिली.  
राज ठाकरेंचे मौन
नरेपार्क मैदानातील क्रीडा संकुलावरून शिवसेनेशी सुरू असलेला वाद, मनोहर जोशींनी शिवसेनानेतृत्वावर डागलेली तोफ या सर्व पाश्र्वभूमीवर रविवारी मनसेच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे घणाघाती बोलतील अशी आशा होती. मात्र राज यांनी यावर वक्तव्य करण्याचे टाळले.