मुंबई: शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे चिन्ह, शाखा यांवरून दोन गटांत झालेली वादावादी आता फलक कोणाचा इथपर्यंत आली आहे. प्रभादेवी परिसरातील जुन्या फलकावरून शिवसेनेच्या दोन गटात चांगलीच वादावादी झाली. या फलकावरून धनुष्यबाणाचे चिन्ह हटवल्यामुळे या वादाला तोंड फुटले. आमदार सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत या भागात तणावाचे वातावरण होते. हे प्रकरण माहीम पोलीस ठाण्यापर्यंत गेले. अखेर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेनेने काळे फळे लावलेले आहेत. हे काळे फळे आणि त्यावरचा मजकूर ही शिवसेनेची ओळख आहे. विभागातल्या महत्त्वाच्या सूचना, विभागातील कोणाचा वाढदिवस, कोणाच्या निधनाचे वृत्त असो किंवा कुठे नोकरभरतीची जाहिरात असा सगळा मजकूर या फलकावर लिहिलेला असतो. सुंदर हस्ताक्षरात हे फलक लिहिणे ही देखील शिवसैनिकांची खास ओळखच. मात्र हे फलकही आता शिवसेनेच्या दोन गटातील वादात सापडले आहेत. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन पक्ष तयार झाले. त्यात शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेच्या दोन गटात विविध मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत. शाखा कोणाची, शिवसेनेचे कार्यालय कोणाचे यावरून सुरू झालेले हे वाद आता फलक कोणाचा इथवर पोहोचले आहेत. शिंदे यांच्या पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले असले तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातर्फे अजूनही धनुष्यबाण चिन्ह वापरले जाते. जुन्या शिवसैनिकांनी अजूनही धनुष्यबाण हटवलेले नाहीत. शिवसेनेच्या फलकांवरही धनुष्यबाण तसेच ठेवले होते.

हेही वाचा : २० हजार संगणक परिचालकांची सेवा संपुष्टात, नवीन नियुक्तीबाबत साशंकता, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकसभा निवडणुकीच्या काळात फलकांवरील हे चिन्ह झाकून ठेवण्यात आले होते. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार धनुष्यबाण हे चिन्ह हटवून मशाल हे चिन्ह लावले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभादेवी येथील आहुजा टॉवर येथे एका फलकावरून धनुष्यबाणाचे चिन्ह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी हटवले. त्यामुळे आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. यावरून दोन गटात चांगलीच वादावादी झाली. हे प्रकरण शेवटी माहीम पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील हा वाद रात्री उशीरापर्यंत सुरू होता. अखेर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हयाची नोंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.