अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. पंधराव्या फेरीअखेर लटकेंना ५५ हजार ९४६ मतं मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नोटाला १० हजार ९०६ मतं मिळाली आहेत. यानंतर शिवसेनेकडून खासदार अरविंत सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “पैसे देऊन नोटाला मतदान करा असं सांगण्यात आलं तरी कारवाई झाली नाही,” असा गंभीर आरोप अरविंत सावंत यांनी केला. ते रविवारी (६ नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
अरविंद सावंत म्हणाले, “ऋतुजा लटकेंच्या विजयाचा आनंद आहे. मात्र, भाजपाने आणि ‘मिंधे’ गटाने अखेरपर्यंत ऋतुजा लटकेंना त्रास दिला. त्यामुळे या निवडणुकीत नोटाला मिळालेली मतं म्हणजे भाजपा आणि ‘मिंधे’ गटाच्या विकृतीचं दर्शन आहे. ही किती विकृत मनोवृत्तीची लोकं आहेत हे आपल्याला पाहता येईल.”
“पैसे देऊन नोटाला मतदान करा असं सांगण्यात आलं”
“मला निवडणूक आयोगाचं आश्चर्य वाटतं. पैसे देऊन नोटाला मतदान करा असं सांगण्यात आलं. त्याचे चक्क व्हिडीओ आहेत आणि त्यात पैसे देताना स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंत देशात असं कधी झालं नाही. हे फक्त भाजपाचं कारस्थान आहे. त्यांची ही विकृत मनस्थिती इथंही दिसली. त्यांनी विनंती केली आणि मग त्यांनी माघार घेतली हे केवळ मोठं निमित्त केलं. हे त्यांच्या संस्कृतीचं विकृत दर्शन आहे. त्यांना संस्कृती हा शब्द शोभत नाही,” असं मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं.
“शेवटपर्यंत भाजपा आणि ‘मिंधे’ गटाने विकृतीचं मनोदर्शन दाखवलं”
अरविंद सावंत पुढे म्हणाले, “भाजपाने देगलूर, पंढरपूर, कोल्हापूरला माघार का घेतली नाही? ही तुमची संस्कृती आहे. एका विधवा महिलेच्या संबंधात शेवटपर्यंत भाजपा आणि ‘मिंधे’ गटाने विकृतीचं मनोदर्शन दाखवलं. यापुढील निवडणुकांमध्येही असंच घडेल, शिवसेना अशीच तेजाने तळपत राहणार आहे. शिवसेनेची संघटना मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा असो की महानगरपालिका असो, हा विजय उद्याच्या विजयाची नांदी आहे.”