शिवसेनेतर्फे शहरात मोफत ५१ हजार नेत्र शस्त्रक्रिया!

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवून भाजपच्या प्रतिमेला तडे पाडायचे, तर दुसरीकडे सामाजिक कामांच्या माध्यमातून मुंबईकरांची मतपेढी भक्कम करायची, अशी रणनीती शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केली आहे. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच मुंबईमध्येही वेळ पडल्यास स्वबळावर लढता यावे यासाठी आगामी वर्षभरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्याची योजना आखण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आगामी वर्षांत मुंबईत मोतिबिंदूच्या ५१ हजार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत केलेल्या कामांची यादी देण्यापेक्षा एकमेकांवर शाब्दिक वार करण्यातच शिवसेना व भाजपची शक्ती पणाला लागली होती. तेथील विभाग छोटे असून मतदारांची संख्याही कमी असल्यामुळे शिवसेनेला फारशी अडचण आली नव्हती. तथापि मुंबईत एकीकडे मराठी टक्का घसरत असून विभागही पन्नास हजार मतदारांचा असल्यामुळे अमराठी मतदार सेनेकडे खेचण्यासाठी आरोग्यासह  वेगवेगळे उपक्रम आगामी वर्षांत राबविण्याची योजना तयार करण्यात आल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त येत्या २४ जानेवारीपासून वर्षभरात मुंबईत ५१ हजार नेत्रशस्त्रक्रिया करण्याची योजना तयार केली आहे. यासाठी गेल्या आठवडय़ात डॉ. सावंत यांच्या निवासस्थानी ‘बॉम्बे ऑप्थॉल्मिक असोसिएशन’ची बैठक घेण्यात आली. शासकीय, महापालिका व खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, एकूण ३०० डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखविल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. २४ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जे.जे. रुग्णालयात डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख या २०१ शस्त्रक्रिया करून या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत.

डॉ. सावंत यांचे चिरंजीव डॉ. स्वप्नेश यांच्या अनदीप रुग्णालयात दोन हजार शस्त्रक्रिया केल्या जाणार असून या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. यानंतर महिलांच्या आरोग्याचा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यादी तयार करणार

मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करायच्या आहेत, अशांची यादी मुंबईतील शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांच्या माध्यमातून करण्यात येणार असून वर्षभरात मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

Story img Loader