शिवसेनेचे युवानेते आणि माजी नगरसवेक अमेय घोले यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला तरुण, तळपत्या नेत्यांची गरज असतानाच अमेय घोले यांचं पक्षांतर ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. युवानेता आदित्य ठाकरे यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमच्या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही. श्रद्धा जाधव आणि सूरज चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली असल्याचं स्पष्टीकरण अमेय घोले यांनी याआधीच दिलं आहे. शिंदे गटात गेल्यानंतर आता त्यांनी त्यांची पुढची रणनीती आणि उद्दिष्ट काय असणार याबाबतीत सांगितलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
हेही वाचा >> ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश का? आदित्य ठाकरेंचं नाव घेत अमेय घोले म्हणाले, “मी पक्ष सोडण्याची कारणं…”
“मी हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाईक!! शिवसेनाप्रमुखांनी हिंदुस्तानातील जनतेला, महाराष्ट्रातील मराठी माणसाला अनमोल विचार देऊन न्याय हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली”, असं ट्वीट अमेय घोले यांनी केलं आहे. ते पुढे म्हणतात की, “बाळासाहेबांचे विचार ज्वलंत ठेवण्याच्या दिशेने, प्रत्येक पाऊल उचलणारे, बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या जनतेप्रती कर्तव्यदक्षतेला प्रभावित होऊन, बाळासाहेबांच्या विचारांच्या वाटेवर ठाम राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व विचारांना अभिप्रेत असलेला विकास सर्वसामान्य माणसाच्या घराघरात पोहोचविणार!” असं म्हणत त्यांनी त्यांची पुढची राजकीय रणनीती आणि दिशा स्पष्ट केली आहेत.
ठाकरे गट का सोडला?
माजी नगरसेवक अमेय घोले यांनी १७ एप्रिल रोजी ठाकरे गटाला रामराम ठोकला. “महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला खूप त्रास आणि मनस्ताप झाला, यामुळे मी युवासेना सोडण्याचा निर्णय घेत आहे”, असं पत्र अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांना लिहित ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.