शिवसेनेतील अतभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक पातळीवर संघर्षाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी
काय म्हणाल्या मनिषा कायंदे?
“बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद हे आमच्याबरोबर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जे आम्हाला चिडवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याला हे चोख प्रत्युत्तर होते. सर्वोच्च न्यायालयातली लढाई आणखी बाकी आहे, ती लढाईदेखील आम्ही जिंकू”, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “ही तर फक्त सुरूवात आहे, आणखी पूर्ण सिनेमा बाकी आहे. त्यामुळे येणारा दसरा मेळावा अतभूतपूर्व असा होणार आहे. मुंबई मनपाच्या निवडणुका समोर असल्या तरी आम्हाला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. आज सामान्य शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. राज्यातले सर्व शिवसैनिक आणि आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत. आज ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं, ते आमच्या जिव्हारी लागलं आहे. हे अपमान शिवसैनिक कधीही विसरणार नाही.”