पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे निर्माण आरोप-प्रत्यारोपांची राळ अजून खाली बसलेली नाही. या विषयावरून आता राज्यातील सत्तेतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना एकमेकांना भिडले आहेत. शिवसेनेने काल केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला लगेचच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे आणि पाकधर्जिण्या कृतीमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. शिवसेना प्रखर राष्ट्रवादी आहे. त्याच राष्ट्रवादी भूमिकेतून पाकिस्तानी कार्यक्रमास विरोध केला. पण ज्या तुकाराम ओंबळेंसारख्या पोलिसांनी पाकिस्तानशी लढताना मुंबईत हौतात्म्य पत्करले ते पोलीस दल मुख्यमंत्र्यांनी पाकड्यांच्या संरक्षणासाठी उतरवून शहिदांचा व शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. पाकिस्तानशी लढणे हा गुन्हा असेल, तर तो गुन्हा शिवसेनेनं केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमानी राष्ट्राभिमानी बाणा देशाने पाहिला, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही – शिवसेनेची टीका
पाकिस्तानशी लढणे हा गुन्हा असेल, तर तो गुन्हा शिवसेनेनं केला आहे - संजय राऊत
Written by विश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 13-10-2015 at 12:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader sanjay raut once again criticized devendra fadnavis