बिहारमधील निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपला मित्रपक्ष भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देतानाच आज जर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळेल, असे सांगत मतदारांना गृहीत न धरण्याचा इशाराही दिला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत तेथील मतदारांनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्यावरच विश्वास टाकला असून, जदयु, राजद आणि काँग्रेस महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. बिहारमध्ये विजयासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या भाजपला जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, कोणतीही निवडणूक ही नेत्याच्या नावावरच लढली जाते. भाजपने ही निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालीच लढविली होती. पण त्यांना निवडणुकीत अपयश आले. आता भाजपने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. नितीशकुमारांनी गेल्या दहा वर्षांत बिहारमध्ये जे काम केले. लोकांमध्ये जो विश्वास निर्माण केला. त्याचे फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले. देशातील नवा नायक म्हणून नितीशकुमार उद्याला येत आहेत. देशाच्या राजकारणाला नवे वळण देणारे हे निकाल आहेत.
शिवसेना आणि भाजपमधील संबंधांवर बोलताना ते म्हणाले, आम्ही विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढलो होतो. आता केवळ सरकारला स्थिरता येण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, आज जरी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी भाजपला इशाराही दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा