दादरी आणि गुलाम अली प्रकरणावर नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या भावना देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी व्यक्त केल्या आहेत. केवळ नरेंद्र मोदी म्हणून ते वेगळे बोलले असते. आमच्या राष्ट्रभक्तीवरून वाद निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पुढील काळातही शिवसेना आपली राष्ट्रभक्ती याच पद्धतीने दाखवत राहिल, असेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील दादरीतील मुस्लिम व्यक्तीस घरात गोमांस असल्याच्या संशयावरून समूहाने ठार मारणे आणि पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमाला झालेला विरोध या अतिशय दु:खद घटना असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी आपले मौन सोडले. मात्र, यामध्ये केंद्र सरकारची भूमिका काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
ते म्हणाले, गोध्रा आणि अहमदाबाद यामुळे नरेंद्र मोदींची देशाला ओळख झाली. राष्ट्रवादी, हिंदूत्त्ववादी नेता अशी त्यांची आतापर्यंत ओळख आहे. त्यांच्या या ओळखीमुळे शिवसेना त्यांचा आदर करते. शिवसेनेला ते प्रिय आहेत. मात्र, आज त्यांनी व्यक्त केलेली भूमिका ही देशाचे पंतप्रधान म्हणून व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून ते वेगळे बोलले असते. पाकिस्तानशी लढणे हा गुन्हा असेल, तर आम्ही तो गुन्हा करत राहू. तसे केले नाही तर या देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Story img Loader