राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भगतसिंह कोश्यारींवर सडकून टीका करण्यात येत होती. तसेच, कोश्यारींनी राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात होता.
पण, अलीकडेच भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन, जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो,” असं कोश्यारींनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर आज ( १२ फेब्रुवारी ) भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला लगावला आहे.
हेही वाचा : “कोश्यारी गेले, सुटलो एकदाचे, पण…”, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला
उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहोत; तर, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनचं पार्सलने माघारी जात आहेत,” असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
दरम्यान, रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. रमेश बैस हे यापूर्वी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल होते. तसेच, वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही संभाळलं होतं.
हेही वाचा : “…म्हणून देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती”, भास्कर जाधवांचं विधान
“…तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो”
भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, “राज्यपालांनी भाजपाचे राजभवनातील एजंट म्हणून काम पाहिलं, ते घटनाबाह्य होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना कोंडी करण्याचा प्रयत्न कोश्यारींनी केला. मंत्रीमंडळाच्या अनेक शिफारसी कोश्यारींनी नाकारल्या. पण, याबाबत राज्यपालांना दोष देत नसून, ते गृहमंत्रालयाच्या दबावात होते. व्यक्ती ही वाईट नसते. मात्र, दबावाखाली काम करावं लागतं, तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.