शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यासाठी गेल्या वर्षभरात शिवसेनेला मुंबईत एकही जागा मिळवता आलेली नाही. शिवाजी पार्कवरील उद्यानरूपी स्मारकाच्या परवानगीसाठीही सेना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. या पाश्र्वभूमीवर बाळासाहेबांचे स्मारक सर्वपक्षीय सहकार्यातून दादर चौपाटीवरील महापौर निवासस्थानी उभे राहावे यासाठी सोमवारी शिवसेना नेत्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनाच थेट साकडे घातले.
पवार यांनीही सायंकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह महापौर निवासस्थान तसेच शेजारील जागेची पाहणी करून स्मारकासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महापौर सुनील प्रभू, पालिकेतील अन्य नेते तसेच अतिरिक्त पालिका आयुक्त मोहन अडताणी उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्याशी झालेल्या चर्चेत भव्य स्मारक उभारण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार खासदार संजय राऊत, आमदार सुभाष देसाई, रामदास कदम तसेच लीलाधर डाके यांनी सोमवारी सकाळी पवारांच्या निवासस्थानी जाऊन स्मारकाबाबत तसेच त्याला सर्वपक्षीय मान्यता मिळविण्यासाठी चर्चा केली.
शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार महापौर निवासस्थान तसेच त्यालगतच्या पार्क क्लबमध्ये हे स्मारक उभारण्याची योजना असून यासाठी महापौर निवास अन्यत्र हलवावे लागणार आहे. या समुद्रकिनाऱ्यावर डॉ. आंबेडकर तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्मारके असून त्यालगतच बाळासाहेबांचेही भव्य स्मारक व्हावे, अशी भूमिका पवारांनी घेतल्याचे या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मात्र सेनेच्याच एका अन्य नेत्याच्या म्हणण्यानुसार शिवसेनेने स्वत:च्या ताकदीवर स्मारकाची उभारणी करायला हवी. पवार यांच्या मदतीने स्मारक उभारण्यात पुन्हा अडथळ्यांची शर्यत निर्माण होऊ शकते. याबाबत संजय राऊत व सुभाष देसाई यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Story img Loader