एकीकडे करोनाचं संकट असताना राज्यात आज अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. राज्यभरात लोक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ साजरा करत आहेत. मात्र करोनाचं संकट आणि लॉकडाउन असल्या कारणाने नेहमीप्रमाणे महाराष्ट्र दिनाला उत्सवाचं स्वरुप नाही. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये जवळपास २० मिनिटं चर्चा सुरु होती. याआधी उद्धव ठाकरेंच्या हस्ते मंत्रालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांची भेट राज्यातील राजकीय परिस्थितीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. यानंतर राज्यपालांनी निवडणूक आयोगाला लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने २७ मेच्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटवरुन महाराष्ट्रातील जनतेला मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०५ हुतात्म्यांचे बलिदान गेल्याने महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र दिनाकडे जिव्हाळय़ाने व भावनिकदृष्टय़ा पाहात आली आहे. त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा निर्णय करून घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. दिल्लीतील प्रमुख नेत्यांची मान्यता मिळाल्याने १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळच्या ऐतिहासिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले होते. अशा या ऐतिहासिक क्षणाचा आज  हीरक महोत्सव असूनही महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा दिवस सध्या करोना विषाणूच्या ग्रहणामुळे अतिशय साधेपणानेच साजरा होताना दिसत आहे.

Story img Loader