एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या वापरापर्यंत एकूण ५ महत्त्वाचे ठराव मंजूर केले आहेत. त्यामुळे बंडखोर शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. या ठरावांमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याच्या शिंदे गटाच्या प्रयत्नाला अडथळा होणार आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत झालेले ५ ठराव
१. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.
२. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे.
३. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.
४. शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहील.
५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.
उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण
उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. “मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उल्हासनगरात खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले; शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी!
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना परखड शब्दांत सुनावलं. “काय तुमचं कर्तृत्व? हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आधी नाथ होते, आता दास झाले. बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. बाळासाहेबांचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल”, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाली, त्यांनी सांगितलंय की…”, रामदास आठवलेंनी दिला सविस्तर तपशील!
“शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्त प्रेम”
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आपल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचं काकणभर जास्तच प्रेम आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून अनेकांना मी सांगतो. तुम्ही हसाल. पण जर शिवसैनिकांना विचारलं तर तो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल. कारण केवळ मी त्यांचा मुलगा आहे म्हणून”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.