इमारत बांधकाम परवानगीबाबत प्रकाशित करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेत २५ वृक्ष तोडण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आल्याचा उल्लेख करीत शिवसेनेने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले होते. परंतु या माहिती पुस्तिकेत आयुक्तांना अधिकार देण्याबाबत पुसटसाही उल्लेख नसल्याचे उघडकीस आल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. तसेच पालिकेतील शिवसेनेच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इमारत बांधकाम परवानगीसाठी सुधारित कार्यपद्धती सुरू करण्याबाबतची माहिती पुस्तिका पालिकेने तयार केली असून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी पालिका आयुक्तांनी याबाबतची कल्पना सर्व पक्षांच्या गटनेत्यांना दिली होती. इतकेच नव्हे तर सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही या माहिती पुस्तिकेवर  प्रकाशझोत टाकण्यात आला होता. इमारत बांधकाम परवानग्यांची संख्या कमी झाल्यामुळे गटनेत्यांनी पालिका आयुक्तांचे कौतुकही केले होते.

या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यामुळे शिवसेनेच्या जिव्हारी लागले होते. आयुक्तांना अडचणीत आणण्यासाठी पालिकेतील शिवसेना नेत्यांनी व्यूहरचना रचायला सुरुवात केली होती. माहिती पुस्तिकेत २५ वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आल्याचा उल्लेख असून बुधवारच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्रस्तावाला समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच पुस्तिकेत त्याचा उल्लेख कसा काय करण्यात आला, असा हरकतीचा मुद्दा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये उपस्थित करून अजय मेहता यांच्याविरुद्ध तोफ डागली.

विकास कामाआड येणाऱ्या वृक्षांबाबतोंतोडण्याची परवानगी मिळावी यासाठी संबंधितांकडून पालिकेकडे प्रस्ताव सादर केले जातात. हे प्रस्ताव सादर झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि ते प्रस्ताव मंजुरीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीच्या पुढील बैठकीत सादर करावेत. वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिल्यानंतर चार दिवसांमध्ये संबंधितास वृक्ष तोडण्यास अनुमती द्यावी, असा उल्लेख या माहिती पुस्तिकेत करण्यात आला आहे. मात्र माहिती पुस्तिका न पाहताच सभागृह नेत्यांनी आयुक्तांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. आता हा प्रकार उघडकीस आल्यामुळे शिवसेना नेत्यांवर नामुष्की ओढवली आहे.नालेसफाई आणि रस्ते कामातील घोटाळा उघडकीस आणल्यानंतर शिवसेनेकडून अधूनमधून आयुक्तांना लक्ष्य केले जात आहे. ‘भाजप बोले, तैसा आयुक्त चाले’ अशी टीका शिवसेना नगरसेवक करू लागले आहेत.

Story img Loader