एका वर्षात मुंबईत पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. भाजपाकडून वारंवार पालिका जिंकण्याची भाषा केली जात असताना शिवसेनेसमोर सत्ता टिकवून ठेवण्याचं आव्हान आहे. त्यातच आता शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे एकेकाळचे निष्ठावंत नेते दिवंगत प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अगदी मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. याचा आगामी पालिका निवडणुकांमध्ये भाजपाला किती फायदा होईल आणि शिवसेनेला किती तोटा, यावर आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मातोश्रीच्या अंगणातच गणित बिघडलं!

वास्तविक तृप्ती सावंत यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकांमध्येच बंडखोरी केली होती. २०१५मध्ये शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार, सेनेचे निष्ठावंत नेते आणि तृप्ती सावंत यांचे पती बाळा सावंत यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेनं तृप्ती सावंत यांनाच तिकीट दिलं. या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते आणि पूर्वीचे कट्टर शिवसैनिक नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणा केली होती. पण तब्बल २० हजार मतांनी तृप्ती सावंत जिंकून आल्या.

तिकीट नाकारलं आणि…

२०१५मध्ये माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या तृप्ती सावंत यांना शिवसेनेनं २०१९च्या निवडणुकांमध्ये मात्र तिकीट नाकारलं. मातोश्री हे शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान असलेला कलानगर भाग ज्या वांद्रे पूर्व मतदारसंघात येतो, तिथूनच तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. मात्र, २०१९मध्ये त्यांना तिकीट नाकारून मुंबई पालिकेचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्या पराभूत झाल्या.

 

शिवसेनेसमोर तृप्ती सावंत यांचं आव्हान?

आता तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी पालिका निवडणुकीत भाजपा तृप्ती सावंत यांचं कार्ड नक्कीच खेळण्याची शक्यता आहे. पक्षाचे एकेकाळचे निष्ठावंत बाळा सावंत यांच्या पत्नीला विद्यमान आमदार असूनही तिकीट नाकारून शिवसेनेने आधीच स्थानिक मतदार आणि इतर निष्ठावंतांचा रोष ओढवून घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून मतदारांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना देखील नाकारून झिशान सिद्दिकी यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली. पण याच मुद्द्याचं भांडवल करून भाजपाकडून पुढील वर्षी पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेवर निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे.