राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यासंदर्भातलं एक पत्रच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आधीच महाविकासआघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केलं जात असताना प्रताप सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे ते प्रश्नचिन्ह अधितच मोठं झाल्याचं दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून या पत्रावर काय खुलासा येतो, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस-राष्ट्रवादीच आपला पक्ष कमकुवत करतायत…

या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “या परिस्थितीमधे जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल”, अशी थेट मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

कोणतीही चूक नसताना आम्हाला त्रास!

दरम्यान, या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रार केली आहे. “कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही कुठेतरी आळा बसेल, आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुटुंबियांवर सुद्धा सतत आघात होत आहेत. खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामून मिळाला, की दुसऱअया केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवणे असे प्रकार होत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे थांबेल”, असं सरनाईक यांनी नमूद केलं आहे.

 

युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध चांगले!

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी या पत्रामध्ये युती तुटल्यानंतरही नेत्यांचे संबंध चांगले असल्याचं नमूद केलं आहे. “पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल”, असं देखील या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

 

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं करण्यासाठी आघाडी?

काँग्रेस राष्ट्रवादीला मोठं करण्यासाठी आपण आघाडी केली का? असा प्रश्न प्रताप सरनाईक यांनी विचारला आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं त्या पक्षांच्या लोकांना वाटत आहे. काँग्रेसनं एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र आहे. महाविकासआघाडीतले काही मंत्री-नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिशी लागू नये, म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं लगेच होता, पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत”, अशी तक्रार देखील प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

दरम्यान, या पत्रावर आता शिवसेनेसोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla pratap sarnaik letter to uddhav thackeray on alliance with bjp narendra modi pmw