सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे रवींद्र वायकर यांची चौकशी केली. तब्बल आठ तास ही चौकशी करण्यात आली. नेमकी ही चौकशी कशासाठी करण्यात आली याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र अधिवेशनाच्या आदल्या दिवशी झालेल्या या चौकशीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान या ईडी चौकशीवर रवींद्र वायकर यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“आरोप वगैरे काही नाहीत. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यांना चौकशीचा अधिकार असून त्यानुसार त्यांनी मला बोलावलं होतं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. बोलावल्यानंतर जाणं आणि स्पष्टीकरण देणं हे या देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे,” असं रवींद्र वायकर यांनी सांगितलं. दरम्यान कोणत्या प्रकरणी चौकशी केली असं विचारण्यात आलं असता त्यांनी माहिती उघड केली जाऊ शकत नाही असं सांगितलं आहे.
चौकशीसाठी एकच अधिकारी उपस्थित होता अशी माहिती रवींद्र वायकर यांनी यावेळी दिली. दरम्यान उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याने चौकशी झाली का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “उद्धव साहेब यांच्या जवळचा आहे म्हणून बोलवलं असं मला वाटत नाही. त्यांना काही शंका होत्या. त्यांचं निरसन केलं. त्यांनी बोलावलं म्हणूनच मी गेलो होतो”.
संजय राऊतांची प्रतिक्रिया
“रवींद्र वायकर चौकशीला जातील आणि आपली भूमिका माडंतील. भाजपाच्या कार्यालयातून जर ईडीची सूत्रं हलत असतील तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आमची सहानुभूती असणाऱ्यांना असा त्रास होणार हे आम्ही गृहितच धरलं आहे,” असा टोला संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.
“जसं काल जया बच्चन यांच्या सूनबाई आणि मुलाच्या बाबतीत आम्ही ऐकलं. जे जे सरकारविरोधात बोलतील, सरकारला प्रश्न विचारतील त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांच्यासमोर उभं करुन अपमानित केलं जाईल. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जाईल हे सूत्र झालं आहे. हे २०२४ पर्यंत चालेल. त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल,” असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया –
“उद्धव ठाकरे यांचे व्यवसायिक भागीदार शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरु झाली आहे. मोठ्यामोठ्या बिल्डर्स, महापालिका कंत्राटदारांकडून जो किकबॅक मिळाला आहे मग तो शेअर कंपन्यांद्वारे, एफएसआय, टीडीआर किंवा शाहीद बलवा, अविनाश भोसले यांच्या कंपन्याकडून मिळालेले प्लॉट, जागा या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.