शिवसेना-भाजप युतीमध्ये मनसे सहभागी झाल्यास युतीला विधानसभेत ५० ते ६० जागांवर तर लोकसभेसाठी किमान आठ-दहा जागांवर लाभ होण्याची शक्यता आहे. विधानसभा काबीज करण्यासाठी आणि लोकसभेतील संख्याबळ वाढविण्यासाठी शिवसेना-मनसे युतीची चर्चा होतअसून हे बेरजेचे राजकारण यशस्वी होणार का, याचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
विधानसभेत भाजपचे संख्याबळ ४७ तर शिवसेनेचे ४५ आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ८ जागांवर पाच हजार पेक्षा कमी फरकाने तर ७ जागांवर १० हजारपेक्षा कमी फरकाने पराभव पत्करावा लागला होता. तर शिवसेनेला ९ जागांवर पाच हजारपेक्षा कमी मतांनी तर १३ जागांवर १० हजारपेक्षा कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. मनसेचे प्रभावक्षेत्र मुंबई, ठाणे व नाशिक असून मनसेचा थेट फटका भाजपला २४ मतदारसंघात बसला. मनसेने मुंबईत १८ लाख मते मिळविली. अनेक जागांवर मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. लोकसभेतही भाजपचे ९ तर शिवसेनेचे ११ खासदार आहेत. भाजपला उत्तर मुंबई, लातूर, गडचिरोली, पालघर, पुणे, नागपूर या ठिकाणी तर शिवसेनेला दोन जागांवर २५ हजारपेक्षा कमी मताधिक्याने पराभव स्वीकाराला लागला होता. मनसेचा एकही खासदार निवडून आला नसला तरी त्यांनी चांगली मते घेतली होती. त्यामुळे त्रिपक्षीय युती झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीला त्याचा लाभ होईल.
ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वर्षभरापासून त्रिपक्षीय युतीची कल्पना मांडली आहे. भाजपने मुंडे यांच्यावर राज्यातील निवडणूक निर्णयांची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचे उध्दव व राज या दोघांशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे हे बेरजेचे राजकारण पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा मुंडे सक्रिय होतील अशी चर्चा आहे .