राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्लाबोल केला. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरसंघचालक भागवत यांना सवाल केलाय. “ड्रग्जचा पैसा देशविरोधात वापरत असेल तर मग सरकार काय करतंय? नोटबंदी केल्यानंतर मोदींनीच दहशतवाद्यांना, माफियांना मिळणारा ड्रग्जचा पैसा बंद होईल असं सांगितलं,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मोहन भागवत यांनी संघाच्या विजयदशमी उत्सवात बोलताना ड्रग्ज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला. यासंबंधी विचारण्यात आलं तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, “सरसंघचालक मोहन भागवत जे म्हणाले आहेत ते योग्य बोलले आहेत. ते जे मत मांडतात त्याचं महत्व असतं. पण जर नार्कोटिक्स, ड्रग्जचा पैसा देशविरोधात कोणी वापरत असेल तर मग सरकार काय करतंय? सरकार कोणाचं आहे? सरकारचं प्रमुख कोण आहे? नोटबंदी केल्यानंतर मोदींनीच ड्रग्जचा पैसा जो दहशतवादी, माफियांना मिळतो तो बंद होईल असं सांगितलं होतं. पण जर असं झालं नसेल तर सरसंघचालकांची चिंता योग्य आहे. आम्ही त्या चिंतेशी सहमत आहोत”.
“प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान असतानाही जर असं होतंय, सरसंघचालक याची जबाबदारी कोणावर ठोकणार?”
“देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान असतानाही जर असं होत असेल तर सरसंघचालक याची जबाबदारी कोणावर ठोकणार? हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे,” असंही असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
मोहन भागवत नेमकं काय म्हणाले होते?
मोहन भागवत म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या आधारावर नवनव्या गोष्टी येत आहेत. या गोष्टी आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाहीये. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येतं? आता करोना काळात तर लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आलाय. ऑनलाईन काय पाहायचं, काय नाही याचं काहीच नियंत्रण नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवायचं याचंही नियंत्रण नाही.”
“देशात ड्रग्जसह वेगवेगळ्या व्यसनात वाढ”
“देशात वेगवेगळ्या नशेचे पदार्थ येतात त्याचं व्यसन वाढत आहे. ते कसं रोखायला हवं हे माहिती नाही. उच्च वर्गापासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत भयंकर व्यसनाचं प्रमाण आहे. या नशेच्या पदार्थांच्या व्यापारातून आलेला पैसा कुणाच्या हातात जातो हे सर्वांना माहिती आहे. देशविरोधी कामात त्याचा उपयोग होतो. सीमेपलिकडील देश या नशेच्या पदार्थांच्या व्यापाराला प्रोत्साहन देतात. असं सर्व सुरू आहे,” असं भागवत यांनी सांगितलं.
हेही वाचा : “चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात…”, संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र
“मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, समाजाचं मन तयार व्हायला पाहिजे”
यावेळी मोहन भागवत यांनी बिटकॉईनवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “बिटकॉईन सारखं चलन आहे. त्यावर कोणत्या राष्ट्राचं नियंत्रण आहे हे मला माहिती नाही. त्यात स्पर्धा तयार होतेय. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवणं, समाजाच्या हितासाठी चालवणं, ड्रग्ज सारख्या व्यसनाचं पूर्ण निर्मूलन होईल यासाठी प्रयत्न सरकारने करायला हवेत. त्यांना हे करावं लागेल. परंतु शासन त्यांचं काम आज नाही उद्या करेल. तसं करण्याचा प्रयत्न करतही आहे. ते आज ना उद्या यशस्वी होतील. परंतु मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. समाजाचं मन तयार व्हायला पाहिजे. बालकाचं मन घरात तयार होतं.”