काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. राहुल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यावेळी भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटाकडून राज्यभरामध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन करुन निषेध व्यक्त केला जात आहे. असं असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणामध्ये उडी घेत पक्ष म्हणून शिवसेनेचा राहुल गांधींच्या विधानाला विरोध असल्याचं म्हटलं आहे. तसेच सावरकरांचा विषय भारत जोडो यात्रेदरम्यान काढण्याची गरज नव्हती असं म्हणत राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> जाहीर सभेत हातवाऱ्यांसहीत राज ठाकरेंची नक्कल करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; म्हणाल्या, “जाणीवपूर्वकपणे महाराष्ट्रातील…”

“भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात उत्तम पाठिंबा मिळत होता. राहुल गांधींनी शेतकऱ्यांसंदर्भात भाष्य केलं. बेरोजगारीबद्दल ते बोलले. तसेच देशासमोर असलेल्या इतर प्रश्नांबद्दल त्यांनी भाष्य करत लोकांमध्ये जागृती निर्माण केली. मात्र या साऱ्यामध्ये वीर सावरकर कुठे आले मध्येच?” असा प्रश्न राऊत यांनी सावरकरांसंदर्भातील वादावर बोलताना उपस्थित केला आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सावरकरांसंदर्भातील राहुल गांधींची मत हा त्यांचा खासगी विषय असून तो भारत जोडोदरम्यान उपस्थित करण्याची गरज नव्हती अशा अर्थाचं विधान केलं आहे. “भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय आहे,” असं राऊत म्हणालेत.

पाहा व्हिडीओ –

“महाराष्ट्राला कायमच वीर सावरकरांचा गर्व वाटत राहणार. संपूर्ण देशाला सावरकरांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “२०२३ मध्ये राज्यात निवडणूका लागणार; भाजपामध्येच प्रचंड…”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’

“भाजपाला सावरकरांबद्दल एवढं प्रेम उफाळून येत असेल तर मी मागील १० वर्षांपासून सांगतोय की वीर सावरकरांना भारतरत्न द्या. त्यांना भारतरत्न देऊन माफीवरुन टीका करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसला भाजपाने उत्तर द्यावं,” असंही राऊत म्हणाले आहेत.

Story img Loader