महाराष्ट्रात मोठ्या उलथापालथीनंतर सर्व राजकीय समीकरणं बदलत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यात महत्त्वाची भूमिका राहिला. आता याला २ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सोशल मीडियावर शिवसेनेच्या एका जुन्या पोस्टची जोरदार चर्चा आहे. यात शिवसेनेच्या फेसबूक पेजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक वक्तव्य आहे. त्यात त्यांनी शरद पवार हे जरी मित्र असले तरी असं म्हणत टीका केलीय. ही २०१२ ची पोस्ट आत्ता चर्चेत आल्यानं शिवसेना-राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे.
शिवसेनेची ही चर्चेतील पोस्ट कोणती?
फेसबुक पोस्टवर समर्थक आणि विरोधक आमने-सामने
शिवसेनेच्या या जुन्या पोस्टवरून आघाडी सरकारच्या विरोधकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक खोचक टोले लगावले. कुणी ही पोस्ट तरी डिलीट करा असं म्हटलं, तर कुणी शिवसेनेने ही पोस्ट डिलीट न केल्या शरद पवार सरकारचा पाठिंबा काढून घेतील असं म्हणत निशाणा साधला. अनेकांनी या पोस्टखालीच शरद पवार, सुप्रिया सुळे यांनाही टॅग केलं.
दुसरीकडे या पोस्टमुळे काहीशी कोंडी झालेल्या समर्थकांनी ‘जुने मुडदे का उकरता’ असं म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांचे विरोधक असताना एकमेकांवर केलेली ही टीका आता त्यांच्या मैत्रीच्या काळात चर्चेत आलीय.
भाजपाकडूनही आघाडी सरकारच्या २ वर्षांच्या कारभारावर हल्लाबोल
दरम्यान, विरोधी पक्ष भाजपाने देखील महाविकास आघाडी सरकारने २ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने जोरदार हल्लाबोल केलाय. “सुपुत्रीच्या आग्रहामुळे राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांनाच बसवावं लागलं. यामुळे महाराष्ट्राची पूर्ण जगात बदनामी झाली,” असा आरोपही केला. पुतण्याबद्दल तर काय सांगावं, त्यांच्या भीतीने त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसवावं लागलं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पवार कुटुंबावर निशाणा साधला.
आशिष शेलार म्हणाले, “सुपुत्रीच्या आग्रहामुळे राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांनाच बसवावं लागलं. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी पूर्ण जगात झाली. वसुली पण होते. १०० कोटी रुपयांचे आकडे पण समोर येतात. गृहमंत्रीपदावरील माणूस गजाआड जातो. मटका किंग, बुकीज यांच्याशी व्यवहार सुरू होतात. पोलीस दलात गटबाजी होते. पोलिसांच्या बदल्या आणि बढतीत दलालांचा सुळसुळाट होतो. सुपुत्रीप्रेमामुळे महाराष्ट्राचं असं चित्र संपूर्ण देशाला दिसलं.”
“पुतण्याबद्दल तर काय सांगावं? त्यांच्या भीतीने…”
“पुतण्याबद्दल तर काय सांगावं? त्यांच्या भीतीने सत्तेच्या त्यांना केंद्रस्थानी बसवण्यात आले. हा निर्णय त्यांचा आहे, पण देशाला काय दिसतं? १००० कोटी रुपयांपेक्षा अधिकची बेनामी संपत्ती कशी आली? एका व्यक्तीने एका आयुष्यात संपूर्ण जीवन झिजवल्यानंतर सुद्धा एखाद कोटी मिळवणं मुश्किल होतं. त्यावेळी १ हजार बेनामी संपत्तीचं चित्र आयकर खातं दाखवतं,” असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं.