१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त याच्या शिक्षा माफीला शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी विधान परिषदेमध्ये सोमवारी विरोध केला. 
या खटल्यात शस्त्रास्त्र कायद्याखाली सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला गेल्या आठवड्यात पाच वर्षांची शिक्षा सुनावली. संजय दत्तने या अगोदर १८ महिन्यांची शिक्षा भोगली असल्यामुळे त्याला आणखी साडेतीन वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने संजय दत्तच्या शिक्षेला माफी देण्याची मागणी केली. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनीही संजयला माफी द्यावी, अशी मागणी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे केली होती. समाजवादी पक्षानंतर कॉंग्रेसमधील विविध ज्येष्ठ नेत्यांनी संजय दत्तला माफी देण्याची मागणी केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही संजय दत्तला माफी द्यावी, अशी मागणी केलीये.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि संजय दत्तचे वडील दिवंगत सुनील दत्त यांच्यामध्ये जवळचे संबंध होते. संजय दत्तने तुरुंगातून सुटल्यानंतर बाळासाहेबांची भेटही घेतली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना संजय दत्तच्या शिक्षा माफीबाबत काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. नीलम गो-हे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना संजय दत्तच्या माफीला विरोध केला.

Story img Loader