मांसविक्रीवर बंदी घालण्याचा प्रश्नच येत नाही. यावर सर्वांना आपली भूमिका मांडली आहे. मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकारांना सांगितले.
भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्युषणाच्या काळात आठ दिवस, तर मुंबई महानगरपालिकेने चार दिवस मांसविक्रीवर बंदी घातली आहे. नवी मुंबई महापालिकेनेही मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मांसविक्री बंदीला शिवसेनेने पहिल्यापासूनच विरोध केला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मांसविक्रीवर बंदी घालू देणार नसल्याचे म्हटले आहे.
जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण काळात मांसविक्रीवरील बंदीचे भाजपकडून समर्थन केले जात आहे. मीरा-भाईंदरमध्ये दीड लाखांच्या आसपास जैन लोकसंख्या असल्यानेच मांसविक्रीवरील बंदीचा निर्णय घेतल्याचा दावा महापौर गीता जैन यांनी केला. तर मुंबईतही हा समाज मोठा असून, या धर्माचा आदर करण्यासाठीच बंदीचा निर्णय योग्य असल्याचे मत भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी व्यक्त केले. काँग्रेस, शिवसेना, मनसे, समाजवादी पक्ष या पक्षांनी या बंदीस जोरदार विरोध दर्शविला आहे.

Story img Loader