राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र आता शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना याबाबत भूमिका स्पष्ट केली.
“अनेक वर्षे शिवसेना राजकारणात आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सहा जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढत आहे. त्यातील दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि निवडून आणू ही शिवसेनेची भूमिका आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. ज्या अर्थी एखादा उमेदार निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करतो तेव्हा त्यांच्याकडे निवडणून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. यासाठी ४२ मते लागतात. संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे त्याअर्थी त्यांच्याकडे ४२ मते आहेत. अशा वेळी आम्ही त्यामध्ये पडणे गरजेचे नाही. पण असं लक्षात येत आहे की त्यांच्याकडे मते नाहीत. त्यांनी आमच्याकडे मते मागितली पण आम्ही कशी मते देणार? आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे अपक्ष नाही. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो,” असे संजय राऊत म्हणाले.
“आम्ही त्यांना शिवसेनेत यायला सांगितले आणि उमेदवारी घ्या असे सांगितले. राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे आम्हाला गरजेचे आहे. तुम्ही छत्रपती आहात त्यामुळे एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले मागे जाऊ. आता निर्णय त्यांचा आहे. मी उद्धव ठाकरेंच्या वतीने सांगत आहे की कोणत्याही परिस्थिती दोन उमेदवार हे शिवसेनेचेच निवडून जातील,” असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.