गेल्या काही दिवसांपासून भाजपाने शिवसेना नेत्यांवर गैरव्यवहार व भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उडवली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपावर आरोपास्त्र डागले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत राऊत यांनी भाजपला आक्रमक प्रत्युत्तर दिले. यानंतर भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांना इशारा देत गंभीर आरोप केला आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “”भाजपाचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार असं मी सांगितलं होतं. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. पण जसे जसे ते आतमध्ये जातील तसे तसे तुम्ही मोजत जा. सोमय्या पितापुत्र नक्कीच जेलमध्ये जात आहे. दुसऱ्यांना धमक्या देता आणि तुम्ही जेलमध्ये जा. ईडीच्या नावे धमक्या, क्रिमिकल सिंडिकेट, खंडण्या हे जे काही सुरु आहे त्याचा भांडाफोड होईल. १९ बंगले दाखवा मी सांगितलं आहे. अर्जुन खोतकर यांना ईडीने कसा आणि काय त्रास दिला हे मला माहिती आहे”.
“मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांना ईडीच्या नावे धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. त्यातील किती टक्के ईडीला गेले हे ते बाहेर सांगत असतात. किरीट सोमय्या आणि त्यांचा बिल्डर मित्र अमित देसाई यांनी जमिनीच्या मालकाला ईडीच्या नावे धमकी देऊन १०० कोटींचा प्लॉट मातीमोल भावात आपल्या नावे करुन घेतला. त्यातील १५ कोटी रुपये किरीट सोमय्यांनी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट करावं नाहीतर मी जाहीर करणार,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला. ईडीच्या नावे काय सुरु आहे हे देशाला कळलं पाहिजे असंही ते म्हणाले.
“किरीट सोमय्या तपास अधिकारी नाहीत. मी एक जबाबदार माणूस आहे. भाजपाने ते जबाबदार माणूस असून त्यांच्या आरोपांशी आपण सहमत असल्याचं जाहीर करावं. सोमय्यांनी बंगले आहेत का सांगावं, कादगपत्रं दाखवू नका. आता ते कर का भरले यावर आले आहेत. देवस्थानच्या जमिनी, बंगले, बेनामी संपत्ती कुठे आहेत हे माझे प्रश्न आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.
“दूधवाला महाराष्ट्रात येतो आणि सरकारमधून काही लोकांचे पैसे आपल्या धंद्यात गुंतवून सात हजार कोटींचा मालक येतो. अमोल काळे कुठे आहे हे मी आजही विचारतो. आमचा अंत पाहू नका, सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करणार,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.