भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचं संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना का मिळत नाही? त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.
किरीट सोमय्यांनी कोर्टाने दिलासा मिळाल्यानंतर केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “आरोपीला तात्पुरता जामीन मिळाला आहे. अपहार १०० टक्के झाला असून आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. आरोपी भूमिगत, फरार झाले होते. खालील कोर्टाचा निकाल पाहिला तर आरोपी निर्दोष नाहीत. कसून चौकशी झाली पाहिजे, पोलीस ठाण्यात हजर झालं पाहिजे असं सांगितलं आहे. त्यांनी जास्त वचवच करु नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा. आपण आरोपी आहोत हे विसरु नका. तुमच्यावर आरोपपत्र आहे. तुम्ही जनतेच्या पैशांचा अपहार केला आहे. टीव्हीवर येऊन मोठ्याने बोलल्याने आरोप धुवून निघत नाहीत. यापेक्षा भयंकर प्रकरणं समोर येणार आहेत”.
“जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात त्याचं पितळ उघड पडलं आहे. आरोपी आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. घोटाळा झालाच आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले आहे, “ज्या परिस्थितीत अटक टाळण्याचा प्रयत्न झाला त्यावरुन एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना का मिळत नाहीत? त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये? विशिष्ट पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत आहे?”.
“आरोपीने कोणत्या परिस्थितीत जामीन मिळवला याबद्दल लोकांच्या मनात संशय आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि इतर सामान्य लोक अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात आहेत. घोटाळा ५८ रुपयांचा असेल किंवा ५८ कोटींचा असेल…अपहार हा अपहारच असतो,” असंदेखील त्यांनी म्हटलं. आज आंबेडकरांची जयंती आहे…आज त्यांनीही अश्रू ढाळले असते असंही ते म्हणाले.
देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती गंभीर
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जग अभिवादन करत आहे. त्यांनी पददलितांना संघर्ष करायला शिकवलं, संघर्षातून स्वाभिमाने उभं राहायला शिकवलं आणि स्वत:चं स्थान निर्माण कऱण्यास बळ दिलं. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही रोज स्मरण करतो आणि तुम्ही जे संविधान निर्माण केलं आहे ते त्याच ताकदीने या देशात, न्यायव्यवस्थेत आणि कायद्यात जिवंत राहावं अशी प्रार्थना करतो. कारण आज देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती इतकी गंभीर झाली आहे की आम्हाला वारंवार त्यांची आठवण येते,” असं संजय राऊतांनी म्हटलं.
“देश फाळणीच्या दिशेने ढकलताना दिसत आहे”
“मी रामनवमीला घडलेल्या घटना पाहिल्या. रामनवमी या देशात आधीही साजरी झाली आहे. भविष्यात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत तिथेच ज्या पद्धतीने रामनवमीला हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला ही निवडणुकांची तयारी आहे. हे रामनवमीला याआधी झालेलं आठवत नाही. हे या देशाचं दुर्देव आहे. हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेने ढकलताना दिसत आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.
राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटमबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “राजकीय मंचावरुन अशा घोषणा होत राहतात. पण सरकार हे सरकार असतं. हे बहुमताचं सरकार असून काय करायचं हे त्यांना माहिती आहे. कोणीही येतं आणि आम्हाला कायद्याची भाषा शिकवत असेल तर त्यांना आनंद घेऊ देत”.
“अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो”
मोहन भागवत यांनी अखंड भारतासंबंधी केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, “अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. २०१४, २०१९ मध्ये भाजपाने याच मुद्द्यावर मतं मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली. अखंड हिंदुस्थान जरुर करा पण आधी काश्मिरी पंडितांची घऱवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे”.