अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून राणा दांपत्याला योग्य उत्तर देण्याची तयारी केली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी संजय राऊतांनी भाजपावरही निशाणा साधला.

नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नऊ वाजताच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केलेले शिवसैनिक बॅरिकेट्स तोडून इमारतीत घुसले आहेत. शिवसैनिकांना पोलिसांकडून रोखण्यात आले. याबाबत संजय राऊतांनी भाष्य केले.

“केंद्रीय पोलीस बलाचा वापर करुन आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक यासाठी सक्षम आहे. शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळे आमचे हात बांधलेले आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत तुमच्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी उत्तर दिले तर तुम्हाला मिरच्या का झोंबत आहे. तुम्ही आमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक शांत बसणार नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.

“राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी याच्या पलिकडे आम्ही गेलेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे असे बाळासाहेबांनी म्हटले आहे. शिवसेना एक शक्ती आहे. त्याचा चटका तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. जे होत आहे ते एकदाच होईल. बायकांच्या आडून भाजपा शिखंडीचे उद्योग करते आहे. हे बंद करा,” असे राऊत म्हणाले.

“हे प्रकरण आम्ही मोठं केलेलं  नाही. तर कालपर्यंत हिंदुत्वावर हल्ले करणारे बंटी आणि बबली किंवा इतर काही नवहिंदुत्ववादी ओवेसी आले आहेत त्यांना मोठं करण्याचे काम भाजपा करत आहे. पण त्यामध्ये त्यांचेच हात पोळणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्यांना ममता बॅनर्जी पुरून उरल्या आहेत. केरळमध्ये त्यांना श्वासही घेता येत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पुरुन उरण्यासाठी त्यांना सात जन्म घ्यावे लागतील,” असे संजय राऊत म्हणाले.

Story img Loader