गेल्या दोन दिवसांपासून राज्यात इंडिया टुडे सी-वोटर सर्वेक्षणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ असं या सर्वेचं नाव असून त्यामध्ये आजघडीला लोकसभा निवडणुका झाल्या, तर देशात आणि महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल, यासंदर्भातली आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात शिंदे-फडणवीसांची लोकसभा निवडणुकीत पीछेहाट होऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला असून महाविकास आघाडीला ३४ लोकसभेच्या जागा जिंकण्यात यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सर्वेवर प्रतिक्रिया देताना तो विश्वासार्ह नसल्याचा दावा केला आहे. “हा सर्वे वास्तवदर्शी नसून फक्त काही लोकांनी दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. आमची आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत काढेल. अशा सर्वेंची आम्हाला गरज नाही. असे अनेक सर्वे होत असतात. या सर्वेमधून काहीही स्पष्ट होत नाही”, अशा आशयाचं विधान एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्यासंदर्भात माध्यमांनी संजय राऊतांना विचारणा केली असता राऊतांनी त्यावरून शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.
श्रीकांत शिंदेंच्या खासदारकीचा उल्लेख!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावताना संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीवरून टोला लगावला आहे. “जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्वे असतात, तेव्हा त्यांना ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्वे भाजपाच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्याविरोधात आहे. तो त्यांना नको आहे. त्या सर्वेनुसार मविआला लोकसभेच्या साधारण ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा साधारण ४० ते ४५ असतील. मुख्यमंत्री म्हणाले की ४-५ जागा मिळाल्या तरी पुरे.माझं म्हणणंय की त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा जरी वाचवली तरी पुरे”, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करताना तसा पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंना का जाहीर करण्यात आला नाही? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.”नुसती तैलचित्र लावून किंवा बाळासाहेब ठाकरे आमचे, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत अशा नुसत्या पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का? हे पाहावं लागेल”, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीकास्र सोडलं.