मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच, यावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच टोला लगावला आहे.
सामना अग्रलेखात काय आहे?
आजच्या सामना अग्रलेखामध्ये ठाकरे गटाकडून मोर्चा काढणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. हा सगळा भाजपाचाच डाव असल्याचं यात म्हटलं आहे. “पराभवाचे हादरे बसू लागले की, भारतीय जनता पक्ष त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्यांवर भाजपा व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. ‘‘आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत,’’ असे या मंडळींनी जाहीर केले, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणतात, “तो काही हिंदू जनआक्रोश…”
दरम्यान, यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “ती भाजपाचीच रॅली होती. तो हिंदू जनआक्रोश वगैरे काही नव्हतं. कालचा मोर्चा कुणी आणि कुणाविरोधात काढला हे स्पष्टच झालं नाही. मला तर असं वाटतंय की भाजपाच्या महाराष्ट्र युनिटनं मोदींविरोधात हा आक्रोश मोर्चा काढला की काय? असा लोकांचा गैरसमज आहे. असा हिंदू जनआक्रोश मोर्चा महाराष्ट्रात निघाला असेल, तर ते आव्हान थेट मोदी शाहांना आहे. कारण नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सगळे स्वत:ला कडवट हिंदुत्ववाही म्हणवून घेणारे नेते आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
“दिल्ली आणि महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे. केंद्रात तर आठ वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. हे दोघेही प्रबळ आणि शक्तीमान नेते आहेत. तरीही धर्मांतरणं होत असतील, लव्ह जिहादसारखे विषय भाजपा सांगतंय तसे घडत असतील, तर हे त्या सरकारचं अपयश आहे. म्हणून ते बहुधा न्याय मागण्यासाठी शिवसेना भवनासमोर व्यथित मनानं जमलेले दिसतात”, असा टोला राऊतांनी लगावला.
“हिंदुंचा आक्रोश पाहायचा असेल तर…”
“खरंतर हिंदूंचा आक्रोश काय आहे, हे पाहायचं असेल, तर या मोर्चेकऱ्यांनी काश्मीरला जाऊन हिंदू पंडितांचा आक्रोश पाहायला हवा. आजही हजारो पंडित जम्मूच्या रस्त्यांवर संघर्ष करत आहेत. हा मोर्चा त्यांनी दर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अपमान केला, तेव्हा या मोर्चेकऱ्यांच्या तोंडात बूच का बसलं होतं? हा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. तिथे हिंदू आक्रोश नाही. काश्मीरच्या बाबतीत हिंदू आक्रोश नाही. हा मोर्चा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेविरोधात निघाला. त्यासाठी मी मोर्चेकऱ्यांचं अभिनंदन करतो”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.