अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलं असून ईडी आता नवनीत राणा यांना चहा कधी पाजणार आहे? या डी गँगला का वाचवलं जात आहे? भाजपा शांत का आहे? अशी विचारणा केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. इतकंच नाही तर भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण, मुंबईमधील घडामोडी यामागे डी गँग, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
संजय राऊत ट्वीटमध्ये काय म्हणाले आहेत –
“सक्तवसुली संचालनालयाने २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी लकडावाला अटक केलं होतं. जेलमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला. युसूफने बेकायदेशीर पद्धतीने कमावलेल्या कमाईचा काही भाग नवनीत राणांच्या अकाऊंटमध्ये आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “आर्थिक संबंधांचा एक पुरावा मी काल समोर आणला आहे. राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमानभक्त झालं आहे. त्या भक्तीत इतके बुडाले की मुंबईत येऊन धिंगाणा घालू लागले. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न करु लागले. राज्यात सध्या जे भोंगे प्रकरण सुरु आहे तसंच हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. ज्याप्रमाणे १९९२ च्या दंगलीत अंडरवर्ल्ड, पाकिस्तान, डी गँग कनेक्शन होतं, आंतरराष्ट्रीय माफिया टोळ्या होत्या. १५ दिवसापासून जे काही घडतंय त्यातून पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे”.
“भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण, मुंबईमधील घडामोडी यामागे डी गँग, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करत आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “डी गँगचा फायनान्सर लकडावाला ज्याचा ईडीच्या कोठडीत मृत्यू झाला, त्या डी गँगचे आणि राणा दांपत्याचे आर्थिक संबंध कसे आहेत याचं एक लहानसं प्रकरण समोर आलं आहे. याची चौकशी ईडीकडून का झाली नाही? जर लकडावालाने मनी लाँड्रिंग केलं आहे आणि पैसा अनेक ठिकाणी फिरवला असून त्यातील एक लाभार्थी राणा दांपत्य आहे. हे पैसे का आणि कशासाठी घेतले हा तपासाचा भाग आहे. पण आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडून घेतलेल्या पैशांचा वापर कुठे केला? अजून काही व्यवहार आहेत का? याचा तपास मुंबईच्या आर्थिक शाखेने का केला नाही? नंतर तो ईडीच्या ताब्यात होता. याचा तपास होणं गरजेचं आहे”.
“राणा दांपत्यासाठी हे मनी लाँड्रिंगचं प्रकऱण आहे. जर नवाब मलिक, अनिल देशमुख आणि आमच्यासारखे अनेक लोक अशा प्रकरणात ईडीचे पीडित ठरले आहेत, तर राणा दांपत्य यातून कसं सुटू शकतं? त्यांना कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती वाचवत आहेत? त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अस्थिरता, अशांतता निर्माण करु इच्छित आहेत. हा तपासाचा विषय आहे. मी एक प्रकरण समोर आणलं असून अजून प्रकरणं आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यांसह सर्व माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य ठिकाणी माहिती पाठवली आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीने चौकशी करेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “का करणार नाही…आधी का केली नाही? आर्थिक शाखेने ही चौकशी का केली नाही हा माझा प्रश्न आहे. नवनीत राणांना साधं चौकशीलाही बोलावलं नाही. तिथे असे कोणते हस्तक होते? लकडावालाकडून ८० लाख खात्यात जमा झालेले असताना चौकशी का झाली नाही? माझा ईडीला प्रश्न आहे. तुम्ही २०-२५ लाखांसाठी आमच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकता, संपत्ती जप्त करता मग २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगमध्ये लकडावाला ताब्यात असताना राणा दांपत्य चौकशीतून कसं सुटलं”.
“मी याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहिले आहात अशी विचारणा त्यांना करणार आहे. देशात अस्थिरता निर्माण करणारे, धर्माच्या नावावर तोडू इच्छिणारे आणि त्यासाठी अंडरवर्ल्ड कनेक्शनचा वापर करणाऱ्यांच्या बाजूने कोणीही उभं राहू नये,” असं संजय राऊत म्हणाले.
“फडणवीस शांत का आहेत? नवनीत राणांनी जातीवरुन छळ केल्याच्या आरोपानंतर आमच्या पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ शेअर केला. त्यावर फडणवीस काही बोलले का नाहीत? इतक वेळी भाजपा नेते पोपटासारखे बोलतात. मग नवनीत राणांच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांवर भाजपाने काहीही उत्तरं न देता इतरांच्या बाबतीत जी भाषा वापरली ती वापरा. आणि ईडीकडे चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.
संजय पांडे शिवसेनेते प्रवेश कऱणार असल्याच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे आधीच्या आयुक्तांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले ते चालतं का? मुंबईतले काही पोलीस आयुक्त, अधिकारी भाजपात सामील झाले आहेत आणि त्यांच्या पालख्या उचलत आहेत. यावरुन राजकीय दबाव कोणावर आहे हे स्पष्ट होतं. कायदेशीर, निष्पक्ष कारवाई केली की त्यांच्यावर शिवसेनेचा शिक्का मारता. मग संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणा, ईडीचे राजेश्वर सिंग भाजपात सामील झाले त्यावर यांचं काय म्हणणं आहे? इतर अनेक राज्यातील पोलीस, आयएएस अधिकारी जे भाजपात सामील झाले आहेत ते भाजपाने स्पष्ट करावं “.