राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात आज भेट होणार आहे. फोनवरुन झालेल्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. के. चंद्रशेखर राव यांनी निमंत्रण स्वीकारलं असून आज मुंबईत त्यांची भेट होणार आहे. या भेटीकडे सध्या राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे. दरम्यान या भेटीवरुन टोला लगावणाऱ्या किरीट सोमय्यांवर शिवसेना खसदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमय्या भर पत्रकार परिषदेत चप्पल उचलत म्हणाले, “मी संजय राऊत यांना माझा जोडा…”

बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत येत आहेत. भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होणार आहे. शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून भेटीला येण्याचे निमंत्रण दिले होते.

“रिश्ते में हम आपके बाप लगते है आणि बाप काय असतो ते…”, संजय राऊतांचा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सोमय्यांवर निशाणा!

“तेलंगणचे मुख्यमंत्री आज उद्धव ठाकरेंना १ वाजता भेटणार आहेत. आम्ही सर्वजण तिथे उपस्थित राहणार आहोत,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “देशाच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, स्टॅलिन किंवा मग उद्धव ठाकरे असो….बिगरभाजपा सरकारं असणारी राज्यं एकत्रित बसून देशातील आगामी राजकारणाबाबत विचार करत आहेत. शरद पवार सर्वात मोठे नेते असून आमचे मार्गदर्शक आहेत”.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी या भेटीवरुन टोला लगावला असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेण्याआधी सोनिया गांधींची परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली आहे. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी पुन्हा एकदा अपशब्दाचा वापर केला. ते म्हणाले की, “कोण आहेत किरीट सोमय्या? देशात असे चु** फार आहेत. देशातील अशा प्रत्येक चु** वर, शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणं मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु** लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशात राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असेल. १० मार्चनंतर तुम्हाला कळेल”.

“एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला येत असताना अशाप्रकारे भाजपाच्या लोकांनी अपमान करणं हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, मराठी लोकांचा अपमान आहे. म्हणूनच मी त्यांना चु**म्हटलं आहे. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देतं हादेखील अपमान आहे,” असं सांगत संजय राऊतांनी आपल्या वक्तव्याचं समर्थनही केलं.

चंद्रशेखर राव भाजपाविरोधात आक्रमक

ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. राव यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या लक्ष्यभेदी कारवाईच्या पुराव्याची मागणी राव यांनी अलीकडेच केली. तसेच भाजपाच्या दडपशाहीविरोधात बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनीही राव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा जाहीर केला आहे. घटनेने दिलेले राज्यांचे अधिकार कायम राहावेत, या मागणीसाठी तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ठाकरे यांनी राव यांचे अभिनंदन करीत त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई भेटीत पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्रादेशिक पक्षांची आघाडी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट होत आहे. ममता आणि राव या दोन मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसशी फारसे जमत नाही. केरळचे मुख्यमंत्री विजयन हे भाजपच्या विरोधात असले तरी त्यांना अजून या आघाडीत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on bjp kirit somaiya telangana cm k chandrashekhar rao uddhav thackeray meet sgy