शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेला प्रस्ताव हा कटाचा भाग असून तो उधळून लावण्याचं आवाहन केलं. या बैठकीत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतना सडकून टीका केली. “आपलं हिंदुत्व अंगार, मशालीप्रमाणे आहे. आपल्यासमोर जे भंगार लोक हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत त्यांना आपल्या अंगारने संपवून टाका,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं संजय राऊत म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. आम्ही १९ जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. मी नागपुरात जाणार आहे. जिल्ह्यांचं वातावरण ढवळून काढलं जाणार असून भाजपाकडून आमच्याविरोधात जे गैरसमज पसरवले जात आहेत, त्यांचा जळफळाट जो बाहेर पडत आहे त्याला उत्तर द्यायचं आहे. उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल मार्गदर्शन केलं,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“कसली जनाबसेना…शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे आणि राहील. शिवसेनच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ झालेली नसून, होऊ देणार नाही. आम्हाला जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासून पहावी,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.

“काश्मीरच्या संदर्भात आज जे आम्हाला अक्कल शिकवत आहेत त्याच भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केलं होतं. मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केलं? आम्ही तेव्हादेखील हे पाकिस्तानवादी, फुटीरवादी असल्याचं सांगत होतो. काश्मीरमधील हुतात्म्यांचा, पंडितांचा अपमान करु नका आम्ही सांगत होतो. त्यामुळे जनाबसेनावाले खरे कोण हे आम्ही महाराष्ट्रात जाऊन सांगू,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.

“मी आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो, मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो”; AIMIMच्या ऑफरवरुन फडणवीसांवर शिवसेनेची टीका

उद्धव ठाकरेंनी यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांचा उल्लेख केल्याचं यावेळी संजय राऊतांनी सांगितलं. ते म्हणाले की, “मोहन भागवत यांनी या देशात जे मुस्मिलांच्या विरोधात भूमिका घेतील त्यांना हिंदू म्हणता येणार नाही असं अनेकदा म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी संबोधित करताना याची आठवण करुन दिली”.

“सध्या एमआयएमच्या ऑफरची चर्चा सुरु आहे, पण मागितलंय कोणी. हा भाजपाचे डावपेच आहेत, हे त्यांचं कारस्थान आहे. एमआयएम आणि भाजपाची हातमिळवणी असून ते छुपे रुस्तम आहेत. शिवसेनेची बदनामी करा, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करा असा आदेश भाजपाने एमआयएमला दिला आहे. त्यानुसारच एमआयएमचे महाराष्ट्रातील नेते ते ऑफर देत आहेत. आम्ही कुठे ऑफर मागितली आहे…शिवसेना कधीही एमआयएमसोबत जाणार नाही. जे औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होतात अशा कोणत्याही पक्षासोबत शिवसेनेचा संबंध कधी नव्हता आणि राहणार नाही. संबंध कोणाचा असेल तर तो भाजपाचा आहे हेदेखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

“एमआयएमकडून आलेली फुकटची ऑफर, फुकटगिरी हा व्यापक कटाचा भाग आहे. राजकीय शत्रूला बदनाम करायचं, षडयंत्र करायचं, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हा भाजपाच्या कटाचा भाग असतो आणि त्यानुसारच कालपासून त्यांनी एमआयएमच्या लोकांना आमची बदनामी करण्यासाठी सोडलं आहे. पण शिवसेना, महाराष्ट्राची जनता सावध आहे. आम्ही ही कट उधळून लावला आहे,” असं राऊत म्हणाले.

“आमचे सर्व खासदार २२ तारखेपासून विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेच्या मनातील संभ्रम तसंच पक्षबांधणीतील त्रुटी यासंबंधी काम करु,” असं संजय राऊत म्हणाले.