पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हिराबेन मोदी यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीही हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली अशून मोदी कुटुंबांच्या दुखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“हिराबेन मोदी यांचं निधन झालं असून शिवसेना, ठाकरे कुटुंब, देशवासी सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहेत. या संकटसमयी आम्ही त्यांच्यासह आहोत. नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं जीवन संघर्षमय होतं. त्यांनी अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी नेहमी संघर्ष केला, कष्ट केले. तेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. अशा मुलाला जन्म देऊन हिराबेन मोदी यांनी समाज आणि देशासाठी मोठं योगदान दिलं,” अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.
“जेव्हा कोणतीही मोठी व्यक्ती आपल्या आईला गमावते तेव्हा अनाथ होते. मग तो श्रीमंत असो, उद्योगपती असो, शक्तिशाली असो…आईचं छत्र हरवलं की तो अनाथ होतो. त्यामुळेच मोदी कुटुंबावर जो कठीण प्रसंग आला आहे त्यावेळी संपूर्ण शिवसेना, ठाकरे कुटुंब, जनता त्यांच्या पाठीशी आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
Video: मोदींना मातृशोक! हिराबेन यांच्या पार्थिवावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार; मोदींनी रुग्णवाहिकेतून केला प्रवास
“त्या एक समृद्ध जीवन जगल्या. त्यांना उत्तम आयुष्य, आरोग्य लाभलं. त्यांनी जीवनाचं एक शतक पूर्ण केलं. त्यांचं जीवन आम्ही अनेकदा पाहिलं, वाचलं, ऐकलं आहे. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मुलांचं संगोपन केलं. त्यातील एक नरेंद्र मोदी होते. जे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते झाले आणि देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान झाले. कितीही सर्वोच्च पदी व्यक्ती असली तरी आईचं छत्र गमावला की ती अनाथ होते. ईश्वर हिराबेन यांच्या आत्म्याला शांती देवो. नरेंद्र मोदींना या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ मिळावं,” असंही ते म्हणाले.