शिवसेने नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. पहाटेच अधिकारी यशवंत जाधव यांच्या माझगावमधील घरी पोहोचले असून चौकशी सुरु आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून प्राप्तिकर विभागाने अद्याप काही माहिती दिलेली नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.
“महिन्याभरात महापालिका निवडणुका आहेत, प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे महापालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, कारण ते खिशाला धनुष्यबाण लावतात. मराठी लोकं आहेत त्यामुळे ते लावत असतात. त्यांच्यावरही हे धाड टाकू शकतात,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. खोटे गुन्हे दाखल करतात, खोटे पुरावे तयार करतात असा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.
मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पहाटेच इन्कम टॅक्सचं पथक दाखल; चौकशी सुरु
” २०२४ पर्यंत हे आम्हाला सहन करायचं आहे. महाराष्ट्रालाही सहन करायचं आहे. पश्चिम बंगाल, झारखंड. पंजाबलाही सहन करायचं आहे. २०२४ नंतर पाहूयात,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “कोणत्याही राजकीय फायद्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करणार, आरोप करणार, कॅबिनेट मंत्र्याला अटक करणार आणि परत आंदोलनही करणार. मग मुख्यमंत्र्यांनाही कोणाचा राजीनामा स्वीकारायचा आणि स्वीकारायचा नाही याचा हक्क आहे”.
“निवडणुकीचं राजकारण सुरु आहे, पण हे खूपच गलिच्छ राजकारण सुरु आहे. निवडणूक हारल्यानंतर किंवा सत्ता आली नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाही यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा तसंच राज्यपाल भवनाचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
आदित्य ठाकरेंनी देशात घाणेरडं राजकारण सुरु असल्याचं बोलल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत. आदित्य ठाकरेंना उत्तर प्रदेशात झंझावत निर्माण केला. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. भाषण ऐकण्यासाठी लोक जमले होते. आपल्या विचारांचं सरकार आलं नाही म्हणून त्या पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या आधारे चिरडून टाकायचं, बदनाम करायचं सुरु आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात. त्याच्यामुळे गंगा जास्त खराब झाली आहे. आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे ते देशातील सध्याचं सत्य आहे. आम्ही पाहून घेऊ”.
“आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा, तपास यंत्रणांच्या माध्यमातून गळे आवळण्याचा प्रयत्न करा पण तरी आमच्या तोंडून सत्यच बाहेर पडेल आणि ते जळजळीत असेल. कितीही घोषणा दिल्या तरी फरक पडत नाही. आम्ही निर्भय आणि बेडर आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.