मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतली. रविवारी रात्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजपा-मनसे युतीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.
भेटीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेकजण येतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं नाही. त्यावर आम्ही बोलावं असं काही नाही”. दरम्यान युतीच्या शक्यतेबद्दल विचारलं असता त्यांनी “त्याविषयी फार काही बोलावं अशी काही स्थिती महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई,” असं उत्तर दिलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या सर्व महापालिका शिवसेना ताकदीने लढेल”. मुंबई महापालिका शिवसेना जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“मुंबई पालिकेवरचा भगवा झेंडा कितीही असंतृष्ट आत्मे एकत्र आले, मराठी माणसं, मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात कितीही कटकारस्थानं केली तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही पालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचली तरी काही फऱक पडत नाही,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत पैसे घेतल्यास मतदारांच्या मागे ईडी लागू शकते असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यासंबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “कोल्हापूरच कशाला…गोव्यातील पणजी, साखळी मतदारसंघातील मतदारांच्या मागे आधी ईडी लावा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील असे काही मतदारसंघ मी सांगू शकतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी काही मतदारसंघात ईडी लावणं गरजेचं आहे”.
पुढे ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी फार चांगली सूचना केली आहे. त्यामुळे गोव्यात उत्पल पर्रीकरांचा पराभव झाला तो पणजी आणि प्रमोद सावंत जिंकले तो साखळी या दोन मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावली तर आम्ही स्वागत करु. चंद्रकांत पाटीला यांचं वक्तव्य चांगलं आहे, महाराष्ट्राचं नंतर पाहू काय करायचं. पण सुरुवात पाच राज्यातील निकाल, मतदारांवर निर्माण केलेला प्रभाव याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील यांना यात पुढाकार घेतला तर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढाईत उभा राहीन”.
शरद पवारांनी युपीए अध्यक्षपदात आपल्याला रस नसल्याचं सांगितलं आहे. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “शरद पवार हे फार मोठे नेते आहेत, आम्ही सर्वच त्यांचा सन्मान, आदर करतो. देशातील विरोधी पक्षाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशातील समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी काही भूमिका ठरत आहेत. शरद पवारांच्या सक्रीय सहभागाशिवाय एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही. शरद पवारांच्या मनात काय आहे आम्हाला माहिती असतं”.
पुढे ते म्हणाले की, “शरद पवारांच्या प्रयत्न, पुढाकाराशिवाय या देशात मोदींना पर्याय तसंच विरोधी पक्षांची एकजूट होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट आहेत. या एकजुटीचं नेतृत्व करण्यासाठी देशात अनेक विरोधी नेते आहेत जे सक्षम आहेत, पण पुढाकार घेण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पुढे यावं असं आमचं मत आहे”.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना राष्ट्रवादीची ढ टीम असल्याचं म्हटलं आहे. यावर ते म्हणाले की, “कोणती कोणाची टीम आहे हा त्यांचा प्रश्न आहे. तोंडाच्या वाफा दवडत आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवेसना मेरिटमध्ये आली आहे म्हणून मुख्यमंत्री झाला. ज्या राज्याचं नेतृत्व शिवसेना करत आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री करत आहे याचा अर्थ त्यांना चांगलं कळतं, निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि राज्यातील लोकांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सलग तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत. हे कोणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षा खाली मानावा लागेल”.
भेटीनंतर गडकरी काय म्हणाले?
राज आणि गडकरी यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. मात्र ही भेट व्यक्तीगत होती असं गडकरींनी राज यांच्या घराबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. राजकीय हेतूने आपण राज ठाकरेंची भेट घेतलेली नव्हतं असं गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं.
“माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं,” म्हणून आपण आलेलो असं गडकरींनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
पुढे बोलताना गडकरींनी, “परवा हृदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला, त्यावेळी राज यांनी म्हटलं होतं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाहीय. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि कौटुंबिक होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही,” असं सांगितलं.