पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राजभवानातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर असणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपा आणि शिवेसना आमने-सामने असताना मोदी आणि ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याने सर्वाचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी लता मंगेशकर यांच्या नावाने नरेंद्र मोदींना पुरस्कार देण्यात आलेल्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरही भाष्य केलं.

Maharashtra Latest News Live : पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

नरेंद्र मोदींच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यानंतर ते मुंबईतील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. राजभवानात ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दालनाचे उद्धाटने नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित असतील.

संजय राऊत काय म्हणाले?

“मुख्यमंत्र्यांनी कधीही पंतप्रधानांना हेतूपरस्पर टाळलेलं नाही. मंगेशकरांचा कार्यक्रम खासगी होता. शासकीय कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी नेहमी राजशिष्टाचार पाळला आहे. शिवसेनेचे आणि मोदींचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. आम्ही आमच्या नात्यात राजकीय भांडण आणलेलं नाही. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी नेहमी एकमेकांचा आदर करतात. ते नेहमी प्रेमभावनेने भेटतात. वर्षानुवर्षाचं हे नातं तसंच आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

“हा दौरा पूर्वनियोजित आहे. करोनामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. अयोध्येतील जागा प्रेरणा देणारी असून वारंवार जावंसं वाटतं. मुख्यमंत्री नसतानाही उद्धव ठाकरे गेले होते. त्यानंतर राज्याला मुख्यमंत्री मिळाले. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी भेट दिली. त्यानंतर महाराष्ट्रावरील करोनाचं संकटाची तीव्रता कमी झाली,” असं संजय राऊत म्हणाले. राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी अयोध्येची भूमी वापरायची नाही असं आम्ही ठरवलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

“माझा पराभव करण्याचा प्रयत्न केला”

“राजकीय आयुष्यात विरोध करणं, दुसऱ्यांचं तसंच राज्याचं चांगलं पाहायच नाही, अडचण निर्माण करायची हेच त्यांचं हिंदुत्व, राजकारण आहे. आम्ही त्यापलीकडे पाहतो. अशा जागा लोक जिंकत असतात त्यात काही मोठं नाही. पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मतं आमच्या उमेदवाराला मिळाली. त्यानुसार आमचा उमेदवार जिंकतो. ज्याला सर्वाधिक मतं पडली तोच जिंकला पाहिजे. इतर निवडणुकी त्याच पद्धतीने आपण जिंकतो. पण राज्यसभेच्या निवडणुकीची यंत्रणा आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं. मला हरवण्याचा प्रयत्न केला, पण मी जिंकलो असंही ते म्हणाले.

“कोणी काहाही म्हटलं तरी आमच्याकडे मतं असतानाही फक्त ४२ मतांच्या कोट्यावर मी उभा राहिलो. इतर मतं दुसऱ्या उमेदवाराला देण्याचा प्रयत्न केला, याला हिंमत लागते. आमचं एक मत बाद करत असल्याचं दिसत होतं. त्यावेळीही मतदान शिल्लक होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालयात बसले होते. त्यांनी असं होत असेल तर संजय राऊतांची दोन मतं वाढवा सांगितलं. पण मी काही गरज नाही, एक मत जरी बाद करण्याचा प्रयत्न केला तरी जिंकेन असं सांगितलं. याला आत्मविश्वास आणि हिंमत लागते,” असं संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं.

“बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची घोषणा खरी ठरली तर आम्ही स्वागतच करु”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या दीड वर्षात मिळणार १० लाख पदं भरण्याचे आदेश दिल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की “हे आम्ही गेल्या आठ वर्षांपासून ऐकत आहोत. आधी दोन कोटी, पाच कोटी आणि आता १० लाखांवर आले आहेत. पण इतके तरी मिळू द्या. पंतप्रधानांनी बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची घोषणा केली असून ती खरी ठरली तर आम्ही स्वागतच करु. आम्ही त्यांच्याप्रमाणे विरोधासाठी विरोध करणारे नाही. नोकऱ्या देण्याची काही योजना आखली असेल आणि महाराष्ट्राच्या वाट्यालाही त्या नोकऱ्या येत असतील तर शिवसेना या घोषणेचं स्वागत करेल”.

“आमच्याविरोधात जे तपास झाले त्यात काहीच सापडलं नाही. बदनामी करण्याशिवाय भाजपाने गेल्या अडीच वर्षात काही केलं नाही. त्यांच्या हाती काही लागलं नाही,” असं संजय राऊतांनी सुशांत सिंगसंबंधी तपासावर बोलताना सांगितलं. तसंच राहुल गांधींच्या ईडी चौकशीवर टीका करताना म्हणाले की, “राजकीय विरोधकांचा छळ करायचा, बदनाम करायचं ही भूमिका राज्यकर्त्यांनी घेतली आहे. हीच या देशाची संस्कृती असल्याचं त्यांना वाटत आहे”.

Story img Loader