उद्योगपती मुकेश अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचं म्हटलं आहे.

खंडणीचे आरोप निराधार : परब

“महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असं असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,” असं संजय राऊत बोलले आहेत.

“यामध्ये अनिल परब यांचं नाव आलं आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझा त्यांच्यावर विश्वास आहे,” असं संजय राऊत बोलले आहेत.

“शपथा घेऊन सुटका होत नसते”, बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेणाऱ्या अनिल परबांना भाजपा नेत्याचा टोला

“अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊन काही करणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

“राष्ट्रीय तपास यंत्रणा आपण ज्यांना म्हणतोय त्यांच्यासाठी विरोधी पक्ष गालीचे अंथरत आहे हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून अस्थिर करण्याचे डावपेच करत असतील तर यशस्वी होणार नाही. काल एका पत्रलेखकाचं पत्र आलं, एनआयएच्या हाती पत्र आहे. हे पत्रलेखक एनआयच्या ताब्यात आहेत. एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी इतक्या यंत्रणा वापरल्या जात आहेत. त्या पत्राची सत्यता कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्मे आहेत याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

सचिन वाझेंच्या पत्रात काय?
सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र न्यायालयात सादर केले. ‘‘आपल्याला पोलीस दलात सहभागी करून घेतल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दूरध्वनी संभाषणाद्वारे दिली होती. मी पवार यांचे मतपरिवर्तन करतो, मात्र त्या बदल्यात दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी देशमुख यांनी केली. असमर्थता दर्शवताच देशमुख यांनी नंतर सावकाश द्या’’, असे सांगितल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला. या वर्षी जानेवारी महिन्यात देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावून शहरातील १६५० बारकडून प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. मंत्री परब यांनी ‘एसबीयुटी’च्या(सैफी बु-हाणी अप लिफ्टमेंट ट्रस्ट) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव विश्वास्तांसमोर ठेवण्यास सांगितले. तसेच महापालिकेच्या कंत्राटदारांविरोधात निनावी तक्रारीवर ‘सीआययू’कडून चौकशी सुरू होती. परब यांनी यातील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे.

Story img Loader