शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून गौप्यस्फोट तसंच गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान संजय राऊत यांच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी या पत्रानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजन आरोप केले. यावेळी त्यांनी मुंबईचा दादा शिवसेना आहे अशा शब्दांत भाजपावर निशाणा साधला.
“मुलीच्या लग्नातील डेकोरेशनवाल्याला बंदुकीचा धाक दाखवला”
माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनला ईडीवाल्यांन उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं. ही काय दादागिरी आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
पत्रातून गौप्यस्फोट केल्यानंतर संजय राऊतांचं भाजपाला जाहीर आव्हान; “इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण…”
“कर्तव्य म्हणून हे पत्र लिहिलं”
“कशाप्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करत विरोधकांचा आवाज दाबवण्यात आला यासंबंधी नरेंद्र मोदींनी कालच राज्यसभेत सांगितलं. आता तर त्यांचं सरकार आणीबाणीपेक्षाही वाईट पद्धतीने राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सभापतींना याची माहिती देत पुढील लढाईला जावं यासाठी पत्र लिहिलं आहे. आम्हाला माहिती नाही असं त्यांना कोणी सांगू नये. कर्तव्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
“मला देशभरातून सर्व प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन आले आहेत. महाराष्ट्र, बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं, प्रमुख लोकांचा गळा दाबायचा, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, त्यांच्याविरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे हे सुरु आहे. पण आमच्यासारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रात सरकार आल्यापासून मी त्यांची वेदना समजू शकतो. त्यांनी राजकीय लढाई लढावी. हे क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत. सध्या ईडी आणि इतर यंत्रणा भाजपा किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनले आहेत. आजचं पत्र हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचा आहे. आजचं पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे. ईडीचे लोक कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, यांचे स्व:तचे आर्थि घोटाळे कसे आहेत, मनी लॉण्ड्रिंग करतात, ब्लॅकमेल करतात, धमकावतात आणि यांचे वसुली एजंट बाहेर आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करणार,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
“ही फक्त सुरुवात आहे”
“हे ठाकरे परिवार, आमच्या प्रमुख नेत्यांना, शरद पवारांच्या परिवाराला बदनाम करत आहेत. महाराष्ट्रातही तपास यंत्रणा तपास करतील. तुम्ही सर्व हातात घेत आहात. तुम्ही मुंबई, महाराष्ट्राच्या पोलिसांपेक्षा मोठे आहात का? तुम्ही संघराज्य प्रणालीची वाट लावत आहात. हुकूमशाही पद्धतीने राज्य करणार असाल तर तुमची पोलखोल करावी लागेल. आतापर्यंत आम्ही राष्ट्रीय एकात्मता, देश म्हणून गप्प बसलो आहोत. माझी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी तसंच इतर नेत्यांशी चर्चा झाली आहे. ही फक्त सुरुवात आहे,” असं राऊत म्हणाले आहेत.
“पवार कुटुंबाकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले होते. नेत्यांची नावं घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. हेच आमच्या बाबतीच घडत आहे. आम्ही गुडघे टेकू असं वाटतं का? हे भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहे. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणारआहे. कारण तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. ईडीला कायदेशीरपणे ज्या कारवाया करायच्या आहेत त्या कराव्यात. पण मीदेखील ईडीच्या कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश कऱणार आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
“जबरदस्ती, दादागिरी केली जात आहे. बाहेरच्या यंत्रणा महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीर डांबून ठेवत आहेत. मुंबई पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे बाहेरचे लोक सुपाऱ्या घेऊन येतात आणि दोन दिवस धमक्या देत डांबून ठेवतात. यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. यांच्याविरोधात काहीजण एफआयआर दाखल करणारे आहेत,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
“ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार”
“सूत्रधार कोण आहेत? ईडी कार्यालयात जाऊन बेकायदेशीरणे भाजपाचे लोक बसतात, त्यांना माहिती, आदेश देतात. मी फडवणीसांना आवाहन करत आहे. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे,” असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.
“उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनाही खूप त्रास दिला जात आहे. रोज कोणीतरी उठतं आणि बेवड्यासारखा बडबडतो नंतर ईडी त्याच्यावर कारवाई करतं. मी मागेही म्हणालो होतो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. संजय राऊतांनी यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.