राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा सध्या ईडी कोठडीत असलेल्या शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’मधून समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे अशी आठवण संजय राऊतांनी करुन दिली आहे. मुंबईच्या विरोधातील कारस्थाने सुरूच राहतील, ती कायमचीच थांबवायला हवीत असं मतही संजय राऊत यांनी मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोखठोकमध्ये काय म्हटलं आहे ?

“राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबईबाबतचे वादग्रस्त विधान; राज्यपालांचा माफीनामा

“कोश्यारी यांनी त्यांच्या एका भाषणात काय सांगितले? ‘‘गुजराती व मारवाडी लोक मुंबईत आहेत म्हणून मुंबईस आर्थिक राजधानीचा दर्जा आहे. गुजराती-मारवाडी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही.’’ राज्यपालांचे हे विधान निर्हेतुक कसे असेल? मुंबईतील गुजराती-मारवाडी समाजाच्या लोकांनाही श्री. कोश्यारी यांचे विधान आवडले नाही व त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा करताच ज्यांचे पित्त खवळले, त्यांनी महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या अपमानाबद्दल साधा निषेध केला नाही. हासुद्धा महाराष्ट्राचा अपमानच आहे,” असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्रात व खासकरून मुंबईत गुजराती समाज पूर्वापार आहे, पण मुंबईवर हक्क आणि पगडा मराठी माणसाचाच राहील. मुंबईत मराठी माणसाचा ‘टक्का’ कमी झाला. मुंबईची आर्थिक सूत्रे मराठी माणसाकडे नसतीलही, पण ही मुंबई मराठी माणसानेच घडवली असे इतिहास सांगतो. मुंबईवर मराठय़ांचे राज्य कधीच नव्हते, असे सांगण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मुंबईवर मराठय़ांनी कधीच राज्य केले नाही, गुजरातने मात्र केलेले आहे असा संदर्भ आजही काही लोक देत असतात. तो खरा नाही. सत्य व इतिहास असा आहे की, मुंबईवर इतिहासकाळात राज्य करणारे गुजराती म्हणजे मुसलमान सुलतान होते, पण त्यांचेही कर्तृत्व असे की, फिरंग्यांच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून त्यांनी मुंबई फिरंग्यांना देऊन टाकली! सन 1534 सालात बहादूरशहा बेगदाने हा करार केला! दुसऱयाचा माल तिसऱयाला देऊन स्वतःचा जीव वाचविण्याची दलाली या बेगदाने घेतली. मराठी राज्यकर्त्यांनी फिरंग्यांबरोबरच्या लढाईत प्राण दिले. तेव्हाच मुंबई शत्रूंना घेता आली. मुंबईसाठी मराठी व मराठे आपले रक्त सांडतात हा इतिहास आहे व कोश्यारी यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी तो समजून घेतला पाहिजे. मुंबईत मराठी माणूस सतत श्रम करीत राहिला व संकटांशी लढत राहिला. बाकी सगळे आले ते फक्त लक्ष्मीदर्शनासाठी,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

विश्लेषण : गुजरात-मराठी भाषिक वाद, कॉस्मोपॉलिटन मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ; जाणून घ्या सर्वकाही

“मुंबईच्या विकासाचा पाया कोणी घातला व आज जे मुंबईचे ‘आर्थिक महत्त्व’ आहे ते कोणामुळे निर्माण झाले? गुजराती समाजाचे त्यात किती योगदान आहे? हे नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे. जुन्या काळातले अभ्यासू पत्रकार पु. रा. बेहरे यांनी याबाबतची बहुमोल माहिती त्यांच्या पुस्तकात दिलेली आहे. ही पुस्तकेही आता दुर्मिळ झाली आहेत. 1668 साली मुंबई ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आली. सर जॉर्ज ऑक्झेंडन हा कंपनीचा मुंबईतील पहिला गव्हर्नर झाला. मुंबई हे नाविक आणि व्यापारी केंद्र बनवायचे हा निश्चय याच गव्हर्नरने केला, पण दुसऱयाच वर्षी ऑक्झेंडन मरण पावला. त्याच्या जागी जिराल्ड अँजिअर हा मुंबईचा गव्हर्नर झाला. ऑक्झेंडनच्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी अँजियरने जंग जंग पछाडले. आधुनिक मुंबईच्या व्यापारी वैभवाची पायाभरणी याच इंग्रज अधिकाऱयाने केलेली आहे. त्यावर दुसरा कोणीही दावा सांगू शकणार नाही. पारशी नाही, गुजराती नाही, राजस्थानी नाही, दाक्षिणात्य नाही, पंजाबी नाही. मराठय़ांनीही तो कधी दावा केलेला नाही. अँजिअर हा सुरतेचाही गव्हर्नर होता. 1672 साली तो मुंबईत येऊन स्थायिक झाला. त्याने प्रथम येथे इंग्रजी कायदा लागू केला व मुंबई शहराची आखणी केली. त्याने मुंबईत टांकसाळ सुरू केली, छापखाना घातला, हॉस्पिटल बांधले, ग्रामपंचायती निर्माण केल्या. बाहेरच्या लोकांनी मुंबईत येऊन वसाहती कराव्यात अशी खटपट सुरू केली. सुरतच्या गुजराती बनियांना मुंबईत येऊन राहण्याचे आमंत्रण अँजिअरनेच दिले,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

“मुंबईत गुजराती लोक 1669 सालापासून राहण्यास आले. ते कोणत्या परिस्थितीत येथे आले, याचा लेखी पुरावाच उपलब्ध आहे. ‘इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी’ या पुस्तकात 26 नोव्हेंबर 1669 चे एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. ते पत्र म्हणजे- ‘यावेळी (म्हणजे 1669 साली) सुरतेच्या गुजराती बनियांचा धार्मिक कारणांसाठी मुसलमान राज्यकर्त्यांकडून भयंकर छळ होत होता. आपली मंदिरे भ्रष्ट होऊ नयेत आणि आपले कुटुंबीय लोक बाटविले जाऊ नयेत म्हणून हे लोक मुसलमानांना मोठमोठय़ा रकमा देत असत, पण तरीही त्यांचा छळ कमी होईना. म्हणून त्यांनी देशत्याग करण्याचे ठरविले. सुरतेचा जुना श्रेष्ठा तुळशीदास पारख याच्या पुतळय़ालाही मुसलमानांनी बाटविले. या बाटवाबाटवीने तुळशीदासच्या अंतःकरणाचा ठाव सुटला. आपल्या घराण्याची अब्रू गेली असे त्याला वाटले. आपल्या जातीवर हे संकट आले असे समजून बनियांनी सुरत सोडण्याचा निश्चय केला, पण गुजरातमधून पळून जाण्यापूर्वी या बनियांचे पाच प्रतिनिधी भीमजी पारख यांच्या नेतृत्वाखाली जिराल्ड अँजिअरला येऊन भेटले. आपल्यावरील संकटाची कल्पना दिली. सुरतेहून आपण पळून आलो तर मुंबई बेटांत आपल्याला रक्षण मिळावे अशी विनंती केली. अँजिअरकडून त्यांनी संरक्षण मागितले. हे लोक आले तर मुंबईचे वैभव वाढविण्यास मदत होईल हे त्याने ओळखले, पण सध्याच्या परिस्थितीत त्यांना संरक्षण देणे धोक्याचे आहे असेही त्याला वाटले. मुंबईच्याच संरक्षणाची धड तयारी नसताना मुसलमान बादशहाचा क्रोध ओढवून घेण्यात अर्थ नाही. तुम्ही अहमदाबादच्या ‘शहा’ला भेटा व कैफियत मांडा. मग प्रसंग पाहून हळूहळू आपली मालमत्ता आणि बायका, मुले मुंबईत आणा, असे त्याने या गुजराती प्रतिनिधींना सांगितले. हा सल्ला मान्य करून ते लोक सुरतला गेले आणि पुढच्या काही दिवसांत आठ हजार बनिये आपल्या बायका-मुलांना मागे ठेवून सुरतेहून निघाले व मुंबईत पोहोचले. सुरतेच्या महाजन म्हणजे बनिया लोकांनी मुंबईला येण्यापूर्वी अँजिअरकडे काही आश्वासने आणि हक्क मागितले. अँजिअरने कंपनीतर्फे त्यांचे म्हणणे मान्य होईल असे आश्वासन या महाजनांना दिले. या लोकांना अँजिअरने व्यापाराच्या आणि इतर मिळून दहा सवलती दिल्या आणि या सवलती मिळाल्यावरच ते मुंबईत आले. आधी जीव वाचविण्यासाठी व नंतर व्यापारात नशीब काढण्यासाठी गुजराती समाजाने मुंबईचा आश्रय घेतला व ते टिकून राहिले. महाराष्ट्राचेच ते घटक बनले,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

नाना शंकरशेट कोणाचे?

“अनेक पारशी व मराठी लोकांनी मुंबईचे वैभव वाढविले. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट या पुरुषाचे मुंबईच्या वैभवात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते स्वतः मोठे धनाढय़ होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपत्ती मिळवली व मुंबईचे वैभव वाढविण्यासाठी खर्च केली. मुंबईचा विकास व असंख्य लोकोपयोगी कामे करण्यासाठी नाना शंकरशेट यांनी आपल्या संपत्तीचा प्रवाह वाहता ठेवला. भाऊ दाजी लाड हे मुंबईच्या वैभवात भर टाकणारे आणखी एक नाव. मराठी धनिक लोक हे कधीच व्यापारी वृत्तीने वागले नाहीत. आपल्या मुंबईसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. गुजराती, पारशी, मराठी असा हा त्रिवेणी संगम मुंबईत महत्त्वाचा ठरतो. मुंबईत आलेला गुजराती समाज पुढे येथे दुधात साखर विरघळावी तसा विरघळून गेला. मुंबईचे अर्थकारण तो चालवतो हे खरे. म्हणून येथील श्रमिकांचे महत्त्व कमी होत नाही. गुजरात व महाराष्ट्र पूर्वी एकच राज्य होते. आज ती जुळी भावंडे बनली आहेत. मग उगाच दुधात मिठाचा खडा का टाकायचा?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“गुजराती व मारवाडी लोकांनी मुंबईत येऊन व्यापार केला व पैसा कमावला, टाटांपासून अंबानींपर्यंत सगळय़ांचे वास्तव्य मुंबईत आहे हेसुद्धा वैभवाचेच लक्षण आहे. बडोद्याचा विकास सयाजीराव गायकवाड यांनी केला. इंदूरवर होळकर व ग्वाल्हेरवर शिंद्यांचा पगडा आहे. मुंबईचे अर्थकारण गुजराती-राजस्थानी लोकांच्या हाती असेल तर त्याबाबत वाईट का वाटावे? मुंबईचे सिने जगत हे तेव्हा व आजही पंजाबी लोकांच्या नियंत्रणाखाली होते, पण लता मंगेशकरही तेजाने तळपत होत्याच. महाराष्ट्राच्या भूगोलावर मुंबई आहे व मुंबईवर मराठी माणसांचा पहिला हक्क आहे. पैशात तो कमी असेल आणि आता तर मराठी माणसाने पैसा कमवायचे म्हटले की, तो अपराध ठरतो. मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला. राज्यपाल महोदय, कधीतरी यावरही बोला,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

“पैसा मिळेल त्या मार्गाने मिळवायची संधी आज एकाच प्रांताला व समुदायाला मिळत आहे. त्यामुळे मुंबईचेच नव्हे तर इतर प्रांतांचेही अर्थकारण बिघडले,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.