केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे सध्या काम करीत आहेत व आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत अशी टीका सामना अग्रलेखात करण्यात आली आहे. २०२४ साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते असंही यावेळी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी बोलताना देशात यापेक्षा वेगळं वातावरण दिसत नाही असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्रावर टीकास्त्र सोडलं. २०२४ पर्यंत हे आम्हाला सहन करायचं आहे. महाराष्ट्रालाही सहन करायचं आहे. पश्चिम बंगाल, झारखंड. पंजाबलाही सहन करायचं आहे. २०२४ नंतर पाहूयात असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
gang vandalised 13 vehicle in aundh
ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना
Mahim Assembly Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray
Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत

“पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील,” शिवसेना नेत्याच्या घरावर IT ने धाड टाकल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

“निवडणुकीचं राजकारण सुरु आहे, पण हे खूपच गलिच्छ राजकारण सुरु आहे. निवडणूक हारल्यानंतर किंवा सत्ता आली नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाही यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा तसंच राज्यपाल भवनाचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे ते देशातील सध्याचं सत्य”

आदित्य ठाकरेंनी देशात घाणेरडं राजकारण सुरु असल्याचं बोलल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत. आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात झंझावत निर्माण केला. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. भाषण ऐकण्यासाठी लोक जमले होते. आपल्या विचारांचं सरकार आलं नाही म्हणून त्या पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या आधारे चिरडून टाकायचं, बदनाम करायचं सुरु आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात. त्याच्यामुळे गंगा जास्त खराब झाली आहे. आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे ते देशातील सध्याचं सत्य आहे. आम्ही पाहून घेऊ”.

“आम्ही निर्भय आणि बेडर”

“आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा, तपास यंत्रणांच्या माध्यमातून गळे आवळण्याचा प्रयत्न करा पण तरी आमच्या तोंडून सत्यच बाहेर पडेल आणि ते जळजळीत असेल. कितीही घोषणा दिल्या तरी फरक पडत नाही. आम्ही निर्भय आणि बेडर आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.

सामना अग्रलेखात तपास यंत्रणांचा नाझी फौजा उल्लेख करण्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “नाझी फौजा क्रूर होत्या. त्या फक्त एखाद्या हुकूमशाहचा आदेश ऐकत होत्या आणि त्यांच्या मालकांची सत्ता टिकवण्यासाठी निरपराध लोकांवर जुलूम करत होत्या. देशात यापेक्षा वेगळं वातावरण दिसत नाही”.

सामना अग्रलेखात काय म्हटलं आहे –

महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये ही श्रींची इच्छा होती. 2024 साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. महाराष्ट्रात आता एका विकृत बेहोशीत हवेत तलवारी चालवणारेही स्वतःच्याच तलवारीने घायाळ होतील. महाराष्ट्राचे ‘ठाकरे’ सरकार अशा हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतविण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे. श्री. नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयातून हसत हसत बेडरपणे बाहेर आले व मूठ आवळून त्यांनी नारा दिला, खोटेपणापुढे झुकणार नाही, लढत राहीन व जिंकेन! हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे.

नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला तसा अंतदेखील झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे सध्या काम करीत आहेत व आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी गुरुवारी सकाळी ‘ईडी’ नामक ‘नाझी फौजा’ पोहोचल्या व 2003 सालच्या एका प्रकरणात त्यांना अटक केली. 2003 साली नवाब मलिक यांनी एक जमीन खरेदीचा व्यवहार केला. तो संबंध दाऊद इब्राहिमशी जोडून मलिक यांच्यावर मनी लॉण्डरिंगपासून गैरव्यवहार, टेरर फंडिंग असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत. 2003 च्या व्यवहारात 2013 साली आलेला मनी लॉण्डरिंगचा कायदा लागू होत नाही. तरीही भाजपच्या नाझी फौजांनी नवाब मलिक यांना अटक केली व त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मुंबईतील भाजपच्या काही लोकांनी रस्त्यावर येऊन तलवारी उपसल्या व धमक्यांची भाषणे केली.

हा जल्लोष बहुधा यासाठी असावा की, मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या खोटेपणाचा रोज बुरखा फाडणाऱया नवाब मलिक यांचा आवाज नाझी फौजांनी दाबला आहे. भाजपविरुद्ध सत्य बोलणाऱयांना ईडी, सीबीआयच्या नाझी फौजा चिरडून टाकतील, असाच संदेश देण्यात आला आहे. नवाब मलिक हे निर्भय आणि बेडर आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे. समीर वानखेडे व त्यांची एनसीबी मधल्या काळात भारतीय जनता पक्षाची बटीक बनली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास क्रुझ पार्टीतील अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करताच त्या बनावट प्रकरणाचा पुरता पर्दाफाश करणारे नवाब मलिक होते व शेवटी वानखेडे नामक अधिकाऱयास जावे लागले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा समोर आला. नवाब मलिक यांच्या जावयासही खोटय़ा प्रकरणात अडकवून दबाव आणला गेला होता. तरीही मलिक झुकले नाहीत व त्यांनी भाजप विरोधाची लढाई सुरूच ठेवली. या लढाईत आता भाजपने नेहमीप्रमाणे पाठीमागून वार केला व विजय झाल्याचा आव आणला. भाजपच्या लोकांनी मुंबईत तलवारी उपसल्या, पण त्यांनी इतिहासाचे भान ठेवले तर लक्षात येईल की, तलवार चालवणारे शेवटी तलवारीच्या घावानेच मरतात. श्री. फडणवीस यांनी तर मलिक यांना जेलमध्ये पाठविण्याचा पणच केला होता. श्री. फडणवीस म्हणतात, मलिक यांनी देशाच्या दुश्मनांशी व्यवहार केलाच कसा? हा प्रश्न चुकीचा नाही. दाऊद हा देशाचा दुश्मन आहेच, पण तसे नवाज शरीफही आहेत, इम्रान खानही आहेत. त्यांनीच दाऊदला लपवून ठेवले आहे, पण त्याच नवाज शरीफला भेटण्यासाठी व मिठी मारण्यासाठी पंतप्रधान मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले. नवाज शरीफ यांच्याच काळात कारगील झाले होते. कश्मीरात आजही हत्यासत्र सुरू आहे व चीनचे घुसखोर मोदी सरकारला बाहेर काढता येत नाहीत. हीसुद्धा दुश्मनांशी हातमिळवणीच आहे. गुजरातमध्ये ऋषी अगरवाल नामक माणसाने राष्ट्रीय बँकांना 23 हजार कोटींना लुबाडले हीसुद्धा देशाशी दुश्मनी आहे. त्या अगरवालला वाचविणारे दाऊदपेक्षा मोठे असेच देशाचे दुश्मन आहेत. त्यावर कोणीच का बोलत नाही? नवाब मलिक यांना ज्या प्रकरणात अडकविले आहे, त्याचा फैसला न्यायालयात होईल.

देशातला कायदा मेलेला नाही व जनता झोपलेली नाही हे उद्या कळेल. सत्य बोलणाऱयांचा गळा घोटणे ही मर्दानगी नव्हे! हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसून दाऊदला खतम करा, नाहीतर फरफटत हिंदुस्थानात घेऊन या. हे लोक बार्बाडोसमधून मेहुल चोक्सी या भगोडय़ास आणू शकले नाहीत, तेथे दाऊदचे काय? केंद्रीय तपास यंत्रणांना आपले गुलाम करून ते मनमानी करीत आहेत. राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहेत. महाराष्ट्रात शरद पवार व त्यांचे कुटुंब, उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंब, संजय राऊत व त्यांचे कुटुंब, अनिल परब, अनिल देशमुख वगैरेंवर बदनामी व खटल्याची कैची लावून विकृत आनंद साजरा करणे हे कसले राजकारण? नवाब मलिकांचे प्रकरण मागे पडेल अशी प्रकरणे भाजप नेत्यांच्या खात्यावर जमा आहेत. आज नाचणारे, तलवारी चालविणारे, खोटे आरोप करणारे भाजपचे पंटर्सही आयुष्यभर तुरुंगात जातील, अशी प्रकरणे उघड होत असताना ‘ईडी’च्या नाझी फौजा त्याकडे दुर्लक्ष करतात. नवाब मलिक यांना आत टाकले, ते केव्हातरी सुटतील. ते सुटतील तेव्हा ते भाजप व त्यांच्या नाझी फौजांसाठी अधिक धोकादायक ठरतील. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये ही श्रींची इच्छा होती. 2024 साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. त्या वेळी नाझी फौजांच्या सरदारांवर खटले चालवून तुरुंगात टाकले जाईल. महाराष्ट्रात आता एका विकृत बेहोशीत हवेत तलवारी चालवणारेही स्वतःच्याच तलवारीने घायाळ होतील. महाराष्ट्राचे ‘ठाकरे’ सरकार अशा हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतविण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे. श्री. नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयातून हसत हसत बेडरपणे बाहेर आले व मूठ आवळून त्यांनी नारा दिला, खोटेपणापुढे झुकणार नाही, लढत राहीन व जिंकेन! हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे!